मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरूस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाईन आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मात्र आनंदाची बातमी असून, या मार्गावर कोणत्याही प्रकारचा मेगाब्लॉक असणार नाही.
मेगाब्लॉकदरम्यान, हार्बर मार्गावरून धावणाऱ्या अप आणि डाऊन या लोकल गाड्यांसाठी हा मेगाब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान असेन.
मध्य रेल्वेमार्गावर ठाणे ते कल्याण डाऊन जलद मार्गादरम्यान मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान, ओव्हरहेडची वायर तपासणे, सिग्नल यंत्रणा योग्य काम करते की नाही हे पहाणे, रूळावरील खडी बदलणे, रूळाला तडे आहेत का ते पहाणे तसेच, इतर काही तांत्रिक कामे केली जाणार आहेत.
मध्य रेल्वे
मेगाब्लॉकदरम्यान मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३.३० या कालावधीत मेगाब्लॉक घेतला जाईल. त्यामुळे डाऊन जलद मार्गावरून धावणारी वाहतूक ही धिम्या मार्गावर वळविण्यात येत आहे. याचा परिणाम म्हणून डाऊन मार्गावरील लोकल सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने अपेक्षित आहे. मेगाब्लॉक असल्या कारणाने अप आणि डाऊन मार्गावरून धावणाऱ्या जलद लोकल्सनाही आपले नेहमीच्या थांब्यांशिवाय मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवर अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे अपला जाणारी वाहतूक १० मिनीटे उशिरा होऊ शकते.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वेवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या कालावधीत मेगाब्लॉक घेतला जाईल. हा ब्लॉक कुर्ला ते वाशी दरम्यान असेन.
परिणामी, अप दिशेकडील वाहतूक सुमारे १० मिनिटे उशिराने धावणार आहे. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील लोकलची वाहतूक सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ वाजेपर्यंत कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान बंद राहणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.
दरम्यान, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष फेºया चालवण्यात येतील. गैरसोय टाळण्यासाठी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मध्य रेल्वेमार्गावरून प्रवास करण्याची प्रवाशांना सूट देण्यात आली आहे.