मुंबई : अवघ्या २० वर्षाचा मयुरेश हळदणकर हा तरूण नेहमी बाईक वापरत होता, मात्र न थांबणारा पाऊस असल्याने त्याने बाईकने जाणं टाळलं, महत्वाचा चेक बँकेत जमा करायचा होता, म्हणून तो लोकलने निघाला, मात्र एलफिन्स्टन ब्रिजवर त्याच्यावर काळाने घाला घातला.
शिवसम्राट मित्रमंडळाचा धडाडीचा कार्यकर्ता, गणपती मूर्तींची आखणी, मूर्तीवर केले जाणारे डायमंड वर्क यात अत्यंत तरबेज असलेल्या मनमिळाऊ मयूरेशच्या जाण्याने बीडीडी चाळीवर शोककळा पसरली आहे.
बीडीडी चाळ-८० येथील मयुरेशवर आपल्या घराची सर्व जबाबदारी होती. लहान वयात पडलेली ही जबाबदारी इमानेइतबारे पार पाडणारा मयूरेश नेहमी बाईकनेच वरळीहून आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचत असे.