मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातली आहे. कांद्याचे दर वाढल्याने केंद्राने तात्काळ पाऊल उचल निर्यातंबदी घातली. त्यानंतर शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी तातडीने हटविण्याबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेद्रसिंग तोमर यांना पत्र पाठवले आहे.
केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कांदा निर्यात बंदी तातडीने हटवावी यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे. केंद्राने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. ही निर्यातबंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी रोहयो व फलोत्पादन मंत्री भुमरे यांनी पत्राद्वारे केली आहे.
राज्यात कोरोनाचे संकट ओढवल्यानंतर आता कुठेतरी बाजार सुरळीत होत होते. त्यातून अत्यंत कष्टाने पिकविलेल्या कांद्याला चांगला भाव मिळत असताना केंद्र सरकारने अचानकपणे कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. एकीकडे चाळीमध्ये साठविलेला कांदा खराब होत आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा तोटा होत असताना कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक फटका बसत आहे, असे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री म्हणाले.
6\