Maharashtra Assembly Election : पक्ष, उमेदवारी आणि जबाबदारी... सुधीर साळवी जनसमुदायासमोर भावूक

नाराजीनाट्य, पक्षफोडी, मनधरणी या आणि अशा अनेक गोष्टींना विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर चांगलाच वेग मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मुंबईतून अजय चौधरी आणि सुधीर साळवी समर्थकांमध्ये असणारे मतभेद, उमेदवारीवरून पेटलेला वाद या साऱ्यानं राजकीय घटनांना वेगळं वळण मिळालं. (Maharashtra Assembly Election)

Updated: Oct 26, 2024, 08:35 AM IST
Maharashtra Assembly Election : पक्ष, उमेदवारी आणि जबाबदारी... सुधीर साळवी जनसमुदायासमोर भावूक  title=
maharashtra assembly election 2024 sudhir salvi shiwdi vidhansabha Mumbai news

मनोज कुळकर्णी, झी मीडिया, मुंबई : नाराजीनाट्य, पक्षफोडी, मनधरणी या आणि अशा अनेक गोष्टींना विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर चांगलाच वेग मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मुंबईतून अजय चौधरी आणि सुधीर साळवी समर्थकांमध्ये असणारे मतभेद, उमेदवारीवरून पेटलेला वाद या साऱ्यानं राजकीय घटनांना वेगळं वळण मिळालं. (Maharashtra Assembly Election)

सूत्रांच्या माहितीनुसार आणि खुद्द सुधीर साळवी यांनी साधलेल्या संवादानुसार उद्धव ठाकरे यांच्याशी साधलेल्या संवादानंतर या परिस्थितीवर तोडगा निघाल्याचं स्पष्ट झालं. शिवडी विधानसभा मतदारसंघासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या उमेदवारीमुळे लालबाग परळ विभागातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. 

विभाग संघटक सुधीर साळवे यांना तिकीट देण्यात यावं अशी मागणी शिवसैनिकांनी केली होती. या तिकीटासाठी सुधीर साळवीसुद्धा इच्छुक होते. किंबहुना त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली सुद्धा होती, पण याही निष्ठावान आमदार म्हणून अजय चौधरी यांनाच शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. यावर लालबाग परळ मधील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली होती, सुधीर साळवी यांनी वेगळा निर्णय घ्यावा अशी गळ त्यांना घातली होती. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात सुखद बदल, कुठे जाणवतोय गारठा, कुठे पावसाच्या ढगांचं सावट 

शुक्रवारी मातोश्रीवर सुधीर साळवी यांना बोलवून खुद्द उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधत समजूत काढली. मातोश्रीवर झालेल्या चर्चेनंतर आपण समाधानी असल्याचं सुधीर साळवी म्हणाले. शिवाय नाराज शिवसैनिकांची समजूत काढणार आणि याही वेळी शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

उमेदवारीवरून कार्यकर्ते नाराज होते, पण भविष्यात पक्ष माझा नक्कीच विचार करेल असं म्हणताना उद्धव ठाकरे यांच्यासमवेत जी चर्चा झाली त्यात मी समाधानी आहे असं म्हणत त्यांनी पक्षाने जो उमेद्वार निवडला आहे त्याला जिंकवून आणायचं हे आमचं काम आहे असा आश्वास्त करणारा सूर आळवला. मी सर्व नाराज शिवसैनिकांशी चर्चा करेन, असं सांगताना 'मी तुमच्या मनातील आमदार असल्यानं राजकारण कधी केलं नाही. समाजकारण करत राहीन', असंही साळवी यांनी जाहीर केलं.