आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारासंघातल्या निवडणुकीच्या लढाईकडे सर्वांचेच लक्ष आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून उमेदवारी जाहीर केली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कल्याणमध्ये तुल्यबळ लढत होणार असल्याची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी ज्यांनी आमच्या पक्षाची गद्दारी केली त्या गद्दारांना आम्ही मदत करणार नाही, असा इशारा दिला आहे. राजू पाटील यांनी हा इशारा पक्षाची गद्दारी केलेल्यांना दिल्याचे म्हटलं जात आहे.
रविवारी कल्याण ग्रामीण येथील पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्रकारशी संवाद साधला. त्यावेळी कल्याण लोकसभा मतदारासंघाबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. पहिले हे लोक एकत्र लढलेले. मात्र त्यात अजून एक गट सामील झाला.लोकसभा तर ट्रेलर आहे खरा पिक्चर विधानसभेला दिसेल. पालिका लेव्हललाही या गोष्टी घडणार त्यावेळेला यांची युतीही नसेल असे राजू पाटील म्हणाले.
"आमचा उमेदवार या ठिकाणी नाही. मात्र राज ठाकरेंचे आदेश आले नाही त्यामुळे इथे कोणाच्या पार्टी जायचं हे ठरलं नाही.
ज्यांनी आमच्या पक्षाची गद्दारी केली त्या गद्दारांना आम्ही मदत करणार नाही. आमच्या भावना आम्ही राज ठाकरेंपर्यंत पोहचवू," असा इशारा राजू पाटील यांनी दिला आहे. "2019 ची निवडणूक तुम्ही पाहिली असेल कल्याण ग्रामीणचा अनुभव बघाल राज साहेबांनी जेमतेम 30 दिवस अगोदर निवडणूक लढवायचे सांगितले. त्या अगोदर आम्ही निवडणुक लढवणार नव्हतो. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, नेहमी तयारच असायला पाहिजे. मी स्वतःही 2014 ला लोकसभा लढलो आहे. त्यामुळे या लोकसभेची बांधणी दाटणी कशी आहे, याचे आम्हाला नॉलेज आहे,' असंही राजू पाटील म्हणाले.
"महायुतीत जाणार असं काही राज ठाकरे यांनी म्हटले नाही. आम्ही त्यांना विचारलं पुढची दिशा काय असेल. त्यावेळी त्यांनी गुढीपाडव्याचा मेळावा असतो त्यावेळी दिशा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज साहेब काय बोलतील हे शर्मिला वहिनी ही सांगू शकत नाही. त्यामुळे आम्ही काय सांगू. मात्र ते महाराष्ट्राच्या हिताचं बोलतील मराठी माणसाच्या हिताच्या बोलतील त्याची गॅरंटी आम्हाला आहे," असेही राजू पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, कल्याण लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना राणे यांना निवडणुकीच्या उतरवले आहे. वैशाली देरकर यांनी 2009 मध्ये यापूर्वी मनसेकडून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यावेळी त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे वसंत डावखरे व शिवसेनेचे आनंद परांजपे हे विरोधक होते. दरेकर यांनी त्यावेळी 1 लाख मते घेत तिसऱ्या क्रमांक मिळवला होता. मात्र त्यानंतर मार्च 2016 ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला.