मुंबई: मुंबईत गुरुवारी जोरदार मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. आज संध्याकाळच्या सुमारास वातावरण ढगाळ झाले होते. त्यानंतर सोसाट्याचा वारा आणि विजेचा कडकडाटसह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे संध्याकाळी घरी जायला निघालेल्या चाकरमन्यांची त्रेधातिरपीट उडाली.
याशिवाय, रायगड जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. नागोठणे , पेण , उरण , रोहा परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. नागोठणे परिसरात काही ठिकाणी गारांचा पाऊसही पडला. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.
हवामान विभागाकडून काही दिवसांपूर्वीच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाल्याचे संकेत देण्यात आले होते. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन १८ ते २० सप्टेंबरदरम्यान ओडिशासह विदर्भ, मराठवाड्यात काही प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता.