Boy Posted Objectionable Video of Ex-Girlfriend: प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हणतात. अनेकदा प्रेमी युगुलं एकमेकांसाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. मात्र हेच प्रेमप्रकरण संपुष्टात आल्यानंतर नेमकं कसं व्यक्त व्हावं हे अनेकांना कळत नाही. यामधूनच अनेकदा सूडाची भावना निर्माण होते आणि या भावनेतूनच आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराला किंवा प्रेयसीला त्रास देण्याचे प्रकार घडतात. मुंबईमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी हा केवळ 20 वर्षांचा असून पीडिता 16 वर्षांची आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ब्रेकअप झाल्याच्या रागातून या तरुणाने आपल्या अल्पवयीन प्रेयसीच्या नावाने बनावट स्नॅपचॅट अकाऊंट सुरु केलं. या अकाऊंटवरुन त्याने तिचा अश्लील व्हिडीओ अपलोड केला. सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर लेखी तक्रारीच्या आधारे 20 वर्षीय आरोपीला समता नगर पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेचे कपडे आणि हेअरस्टाइलवरुन आरोपी नेहमीच तिच्याबरोबर वाद घालायचा. केवळ वादच नाही तर आपल्या प्रेयसीच्या कपड्यांची निवड आणि हेअरस्टाइलवरुन झालेल्या भांडणांमधून अनेकदा या तरुणाने तिला मारहाणही करायचा. या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून 16 वर्षीय तरुणीने या तरुणाबरोबरचे सगळे संबंध तोडून टाकण्याचा निर्णय घेतला. आपण या पुढे आपलं नातं टिकवण्यात अर्थ नसून वेगळे होऊयात, असं या मुलीने तरुणाला कळवलं. तिने या तरुणाबरोबर ब्रेकअप करत असल्याचं सांगत त्याच्याशी बोलणं बंद केलं.
पीडित तरुणी सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तिने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीबरोबर पूर्व प्रेमसंबंध होते. मात्र माझा प्रियकर अनेकदा माझे कपडे आणि हेअरस्टाइलवरुन नेहमी आक्षेप घ्यायचा. त्याने मला मारहाणही केली होती. यामुळेच मी त्याच्याबरोबर ब्रेकअप केल्याचं या पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे. ब्रेकअप करुन वेगळं होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आरोपीने आपल्याला धमकावल्याचंही तरुणीने पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटलं आहे. आता प्रेयसी आपल्याला सोडून जाणार म्हणून सूड उगावण्याच्या उद्देशाने या तरुणाने स्नॅपचॅटवरुन अनेक व्यक्तींना तिच्या खोट्या प्रोफाइलवरुन तिचा अश्लील व्हिडीओ पाठवला.
मात्र अचानक प्रेयसी सोडून गेल्याने संतापलेल्या या तरुणीने मुलीला धडा शिकवण्याच्या उद्देशाने तिची बदनामी करण्याचा कट रचला. या आरोपीविरोधात पोलिसांनी विनयभंगाबरोबरच पीडिता अल्पवयीन असल्याने बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण करणारा कायदा म्हणजेच पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदर गुन्हा डिजीटल माध्यमातून घडल्याने पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.