मुंबईकरांचा अंत पाहू नका, गरीब मुलांना सरसकट शिष्यवृत्ती द्या! भाजप आमदाराची मागणी

मुंबई महानगर पालिका शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा न घेण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे

Updated: Aug 11, 2021, 11:03 PM IST
मुंबईकरांचा अंत पाहू नका, गरीब मुलांना सरसकट शिष्यवृत्ती द्या! भाजप आमदाराची मागणी title=

मुंबई : पाचवी व आठवीच्या वर्गासाठी संपूर्ण राज्यात शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाणार असली तरी मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका शाळांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यास पालिकेच्या शिक्षण विभागाने नकार दिला आहे. त्यामुळे पालिकेच्या शाळेतील सुमारे आठ हजार विद्यार्थी या परिक्षेपासून वंचित राहणार आहेत.

मुंबई महानगरपालिका गरीब मराठी भाषिक मुलांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप भाजप आमदार योगेश सागर यांनी केला आहे. यासंदर्भात आमदार योगेश सागर यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना एक पत्र लिहिलं आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये गरीब मराठी भाषिक तसंत इतर भाषिक मुलं शिकतात. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते अशा पालकांची मुलं या मनपा शाळांमध्ये शिकतात. अशा मुलांना खास करून मराठी भाषिक मुलांना या शिष्यवृत्तीची अत्यंत आवश्यकता असते, असं आमदार योगेश सागर यांनी म्हटलं आहे. 

राज्य शासनाने मुंबईत कोरोनाची साथ नियंत्रणात असल्याचा दावा केला असून त्याचं श्रेय मुंबई महानगरपालिकेला दिलं आहे. मुंबईत परिस्थिती नियंत्रणात असताना शिष्यवृत्ती परीक्षा न घेणं हा मराठी भाषिक आणि इतर मातृभाषेत शिकणाऱ्या गरीब मुलांवर अन्याय आहे, मराठी भाषिक मुलांवर अन्याय होता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या गरीब मुलांना सरसकट शिष्यवृत्ती द्यावी अशी मागणी आमदार योगेश सागर यांनी केली आहे.