मुंबई : पावसाळ्यात साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील टायर पंक्चर्स दुकानदारांनी दुकानासमोर उघड़्यावर ठेवलेल्या निकामी टायर्समध्ये पावसाचे पाणी साचून त्यामुळे मलेरिया, चिकनगुनीया व ड़ेंग्युताप पसरवणा-या ड़ासांची पैदास आढ़ळून आल्यास अशा दुकानदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.
पावसाळ्यात दरवर्षी टायर पंक्चर दुकानांबाहेर उघड़्यावर ठेवलेल्या टायर्समध्ये किंवा दुकानांच्या आजूबाजूच्या मोकळ्या जागेत टाकलेल्या टायर्समध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे मलेरीया, चिकनगुनीया तसेच ड़ेंग्युताप पसरविणा-या ड़ासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे साथीचे रोग पसरुन शहरातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात दुकानदारांनी दुकानाबाहेर उघड़्यावर ठेवलेल्या निकामी टायर्समध्ये किंवा पाण्याच्या पिंपामध्ये पावसाचे पाणी साचून त्यामध्ये ड़ास-अळी आढ़ळून आल्यास तसेच यामुळे आजुबाजूच्या परिसरात मलेरीया, चिकनगुनीया तसेच ड़ेंग्युतापाचे डास आढ़ळल्यास महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदीनुसार संबंधित दुकानदारावर पालिकेच्या आरोग्य विभागाकड़ून कारवाई करण्यात येणार आहे.
साथीचे रोग पसरण्याआधीच ठाणे महानगरपालिकेने प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी सदर सूचना टायर पंक्चर्स दुकानदारांना दिल्या आहेत. शहराचे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी दुकानदारांनी दुकानाबाहेर निकामी टायर्स न ठेवता ते टायर्स एकावर एक रचून ताड़पत्रीने आच्छादीत करुन ठेवावेत किंवा एखाद्या बंदीस्त गोदामात ठेवावेत. त्याचप्रमाणे पंक्चर टेस्टींगसाठी ठेवलेले पाण्याचे टब दर दोन ते तीन दिवसांनी रिकामे करुन सुक्या कपड़्याने कोरड़े करुन पुन्हा भरावे जेणेकरुन त्यामध्ये ड़ास-अळ्यांची पैदास होण्यास अटकाव होईल अशाही सूचना पालिकेच्या आरोग्य विभागाकड़ून शहरातील दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.