भाजपचा शिवसेनेला १२ तासांचा अल्टिमेटम, अन्यथा स्वबळाची तयारी

सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

Updated: Nov 6, 2019, 07:41 PM IST
भाजपचा शिवसेनेला १२ तासांचा अल्टिमेटम, अन्यथा स्वबळाची तयारी title=

मुंबई : राज्यातल्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपने शिवसेनेला १२ तासांचा अल्टिमेटम दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपची स्वबळावर सत्तास्थापनेची तयारी झाली आहे. पक्षश्रेष्ठींनीही राज्य नेतृत्वाला सत्तास्थापनेसाठी हिरवा कंदील दाखवला आहे, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजप गुरुवारी सत्तास्थापनेचा दावा करणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या राज्यपालांची भेट घेणार आहेत. सरकार बनवण्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट होणार असल्याचं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान सर्व घडामोडींच्या पार्श्वभुमीवर नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड करायची नाही असे या बैठकीत ठरल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार नाही आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील यावर या बैठकीत निर्णय झाला.

शिवसेनेने पाठिंबा न दिल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपाती तयारी असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. शिवेसनेने पाठिंबा दिल्याशिवाय सत्तास्थापनेचा दावा करणार नाही असेही या बैठकीत ठरल्याची माहिती समोर येत आहे.