मुंबई : Action against illegal Construction in MHADA colony in Mumbai :मुंबईत म्हाडा वसाहतीत करण्यात आलेली बेकायदा बांधकामं पाडण्याचे आदेश म्हाडाने दिले आहेत. ही बांधकामं विशिष्ट मुदतीत न पाडणाऱ्या अभियंत्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. इतकंच नव्हे तर निलंबनाची कारवाई करण्यात मागेपुढे पाहण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अभियंत्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करणाऱ्या वरिष्ठ अभियंत्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे म्हाडा वसाहतील बेकायदा बांधकामे पाडण्याच्या मोहिमेला गती मिळेल अशी शक्यता आहे. भिवंडी-निजामपूर महापालिका हद्दीतील जिलानी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा संदर्भ देत म्हाडा उपाध्यक्षांनी हे परिपत्रक जारी केले आहे.
म्हाडा वसाहतीत करण्यात आलेली बेकायदा बांधकाम पाडण्यात येत आहे की नाही याबाबत दर महिन्याच्या 25 तारखेनंतर आढावा घेतला जाणार आहे. अशी बेकायदा बांधकामं पाडण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली जाईल. पहिल्यांदाच असा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्यांची अंमलबजावणी होते का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्याचवेळी म्हाडा वसाहतीत ज्यांनी बेकायदा कामे केली आहेत, त्यांचे धाबे दणाणलेत. तर कारवाईच्या भीतीने अधिकारीही धास्तावलेत.