वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याने पोलिसांनी रोखलं असता, महिला दुचाकीस्वाराने पोलिसांनाच अर्वाच्च भाषेत शिवागीळ करत धमकावलं. मुंबईतील वांद्रे वरळी सी-लिंकवर ही घटना घडली. महिला पोलिसांना धमकावत असतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही महिला वास्तुविशारद असून पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलेने दुचाकी रोखल्यानंतर ती बंद करण्यास सांगितलं असता पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्कीही केली. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन केल्यानंतरच मी बाईक बंद करणार अशा शब्दांमध्ये वाद घातला.
महिला दुचाकीस्वार पोलिसांशी वाद घातलानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिला वरळी सी-लिंकवर दुचाकी पळवत असल्याने पोलीस कर्मचाऱ्याने तिला रोखलं होतं. यावेळी महिलेने आपली चूक मान्य करण्याऐवजी वाद घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान, तिने पोलिसांसाठी अपशब्द वापरले.
महिलेला रोखण्यात आलं असता, पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला बाईक बंद करण्यास सांगितलं. पण तिने नकार दिला. इतकंच नाही तर कर्मचाऱ्याने बाईक बंद करण्याचा प्रयत्न केला असता, ती संतापली आणि जाहीरपणे धमकावू लागली. 'हात कापून टाकेन, माझ्या गाडीला हात लावण्याची हिंमत कशी झाली,' अशा शब्दांत महिलेने धमकी दिली.
व्हिडीओच्या सुरुवातीला महिला वरळी-सी लिंकवर बुलेटवर बसलेली दिसत आहे. यावेळी इतर गाड्या तिच्या आजुबाजूने जात असतात. यादरम्यान पोलीस कर्मचारी वायरलसेवरुन महिला रोखण्यात आलं असता जोरजोरात बोलत वाद घालत असल्याचं कळवत आहे. महिलेला गाडी बंद करण्याची विनंती करण्यात आली असता, 'अजिबात नाही. मी तुमची नोकर नाही. मी कर भरते. या ब्रीजवर उभं राहणं माझा हक्क आहे', असं सांगते. नरेंद्र मोदींचा फोन येईल की नुपूर गाडी बंद कर, तेव्हाच मी बंद करेन असंही ती म्हणते. ही गाडी आता थेट दिल्लीला जाऊन थांबेल असंही ती पोलिसांना सांगत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून त्यांना नुपूर मुकेश पटेल नावाची एक महिला वांद्रे-वरळी सी-लिंकवर बाईकवरुन मुंबईच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली होती.
#Mumbai
26-year-old woman from MP, identified as Nupur Patel and is apparently an RJ was arrested by the police on September 15 for allegedly joyriding on her motorcycle — without a helmet — on the Bandra-Worli Sea Link, where two-wheelers are not permitted.
The situation became… pic.twitter.com/QUlRfnXQ28— Kamran (@CitizenKamran) September 25, 2023
"जेव्हा पोलीस कर्मचाऱ्याने तिला रोखलं, तेव्हा तिने वाद घातला. हा आपल्या वडिलांच्या मालकीचा रस्ता असून, मी कर भरते आणि कोणी मला रोखू शकत नाही असं ती बोलू लागली. अनेकदा विनंती करुनही ती दुचाकी बंद करण्यास आणि रस्त्याच्या बाजूला घेण्यास तयार होत नव्हती. यादरम्यान ती सतत वाद घालत होती," अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
महिला विनाकारण वाद घालत होती. यावेळी तिने पोलीस कर्मचाऱ्याला धक्काही दिला अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. तिच्याविरोधात कर्तव्यात अडथळा, निष्काळजीपणे वाहन चालवणे, धोका निर्माण करणं आणि सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुपूर पटेल मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी असून बुलेट तेथील एका रिअल इस्टेटच्या नावावर नोंद आहे. महिलेला कलम 41A अंतर्गत तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. यानंतर तिला जाण्याची परवानगी देण्यात आली.