मुंबई : मुंबई, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाने जोर धरलाय. या परिसरतील नद्यांची पाणी पातळी वाढली आहे, शिवाय काही भागांत दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्यात. दरम्यान मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान गुरुवारपासून दोन ते तीन दिवस कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून कायम ठेवण्यात आला आहे.
गेल्या 2 दिवसांपासून कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होताना दिसतेय. कोकणातील काही भागात 200 मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद करण्यात आलीये. तर मुंबई आणि ठाणे परिसरातही काही भागांत गेल्या चोवीस तासांत 180 ते 200 मिलिमीटर पाऊस झालाय.
लोणावळा आणि महाबळेश्वर या परिसरामध्ये 24 तासांमध्ये 150 ते 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे.