मुंबई : स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेनं यू टर्न घेत विधान परिषद निवडणुकीत भाजपशी युती केलीय. तर दुसरीकडं आघाडीची भाषा करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीत मात्र बिघाड झालाय. लातूर-बीड-उस्मानाबादच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटलीय. या निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादीनं भाजपलाही मोठा दणका दिलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येत्या २१ मे ला होणारी निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादीनं भाजपला जोरदार झटका दिलाय... लातूर ग्रामीणमधले भाजपचे वजनदार नेते आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंचे मानलेले भाऊ रमेश कराड भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत.. पंकजा मुंडेंचे पक्के विरोधक आणि सख्खे चुलतबंधू धनंजय मुंडे यांनीच कराड यांना राष्ट्रवादीत आणलंय...
१२ वर्षांपूर्वी कराड यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळं भाजपात आलेल्या कराड यांना २००९ आणि २०१४ मध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजपनं विधानसभेची उमेदवारी दिली होती.
मात्र दोन्ही वेळा ते पराभूत झाले. आता त्यांनी लातूर-बीड-उस्मानाबादमधून विधान परिषदेची उमेदवारी मागितली होती. मात्र भाजपनं सुरेश धस यांना पसंती दिल्यानं कराड नाराज झाले... त्यांना गळाला लावत धनंजय मुंडेंनी कराडांना पुन्हा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादीत आणलं. त्यामुळं लातूर, बीड, उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पंकजा विरूद्ध त्यांचे बंधू असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
या निमित्तानं राष्ट्रवादीनं भाजपला मोठा राजकीय दणका दिला असला तरी त्यामुळं काँग्रेसशी होऊ घातलेली आघाडी मात्र मोडावी लागलीय. लातूर-बीड- उस्मानाबादच्या याच जागेसाठी मध्यंतरी शरद पवार यांनीही आग्रही भूमिका घेतली होती. कराड यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिल्यानं नाराज झालेल्या काँग्रेसनं राज किशोर मोदी यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
आघाडीत बिघाडी झाली असताना, शिवसेना-भाजपचं मेतकूट मात्र पुन्हा एकदा जमलंय. नाशिक, कोकण आणि परभणी-हिंगोलीत शिवसेनेची ताकद जास्त असल्याचा दावा करत शिवसेनेनं आधीच उमेदवार जाहीर केलेत. नाशिकमधून नरेंद्र दराडे, कोकणातून राजीव साबळे, तर परभणी हिंगोलीतून विप्लव बजोरिया यांना शिवसेनेनं उमेदवारी दिलीय. तर उस्मानाबाद-लातूर-बीड, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली अशा तीन जागा भाजप लढवणाराय... यापुढच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत केली होती. मात्र सपशेल यु टर्न घेऊन शिवसेनेनं भाजपशी जुळवून घेतल्याचं सध्या तरी दिसतंय... आता या निवडणुकांचा काय निकाल लागतोय, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.