Gautam Adani Son Wedding : लग्नसोहळा म्हटलं, की तिथं खर्च आलाच. अनेकदा या कार्यक्रमांसाठी इतका खर्च केला जातो की हाच खर्च डोळे दीपवून जातो. काही दिवसांपूर्वीच आशियातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत गणल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा अर्थात अनंक अंबानीचा विवाहसोहळा पार पडला. राधिका मर्चंटसह अनंत विवाहबंधनात अडकला. इथं या लग्नसोहळ्याच्या चर्चा थांबत नाहीत, तोच गौतम अदानी यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
श्रींमंतांच्या याच यादीत असणाऱ्या गौतम अदानी यांच्या धाकट्या मुलाचा विवाहसोहळा 7 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. याचदरम्यान जीत अदानीच्या विवाहसोहळ्यामध्ये टेलर स्विफ्ट आणि तत्सम सेलिब्रिटींची हजेरी असणार आहे, अशा चर्चांनी जोर धरला. पण, या सर्व चर्चांना खुद्द अदानींनी पूर्णविराम दिला.
प्रयागराज इथं कुंभमेळ्यामध्ये उपस्थितीदरम्यान अदानींनी काही गोष्टी अधिक स्पष्टपणे सांगितल्या. हा विवाहसोहळा अतिशय साधेपणानं होणार असून, पारंपरिक स्वरुपात पार पडणार असल्याचं अदानी म्हणाले. इथं अदानी त्यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यासंदर्भात स्वत: माहिती देत असतानाच तिथं माध्यमांमध्ये मात्र वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या होत्या. काही पोस्टच्या मते तर, अदानींच्या कुटुंबातील या विवाहसोहळ्यामध्ये जगभरातील आघाडीचे शेफ अहमदाबाद इथं आल्याचंही सांगण्यात आलं.
जीत अदानीच्या लग्नसोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांची गर्दी आणि त्यांची श्रीमंती पाहता या पाहुण्यांच्या वास्तव्यासाठीसुद्धा तोडीस तोड व्यवस्था करण्यात आल्याचं सांगितलं जात असलं तरीही अदानी यांनी मात्र माध्यमांना दिलेली माहिती सर्वांचं लक्ष वेधून गेली.
#WATCH | Prayagraj, Uttar Pradesh | On his son Jeet Adani's marriage, Adani Group chairman, Gautam Adani says, "Jeet's marriage is on 7th February. Our activities are like common people. His marriage will be very simple and with full traditional ways..." pic.twitter.com/CebEZ4q14i
— ANI (@ANI) January 21, 2025
'7 फेब्रुवारी रोजी जीतचा विवाहसोहळा पार पडणार आहे. आम्ही मुळातच साध्या राहणीमानात वावरणाली लोकं आहोत. त्यामुळं जीतला विवाहसोहळा अतिशय साधेपणानं आणि परंपरागत स्वरुपात पार पडणार आहे', असं गौतम अदानी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. या विवाहसोहळ्यासाठी कोणी सेलिब्रिटी येणार का? असं विचारलं असता 'अजिबात नाही!' इतक्या मोजक्या शब्दांत उत्तर गेत हा लग्नसोहळा कुटुंबीयांच्याच उपस्थितीत पार पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.