Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात सध्या चार वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. पण लवकरच मुंबईतून देशातील पहिली स्लीपर वंदे भारत धावणार आहे. चेन्नईच्या आयसीएफ फॅक्टरीत वंदेभारचे स्लीपर कोच तयार केले जात आहेत. तर, दुसरीकडे मुंबई ते दिल्ली दरम्यान मार्गाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. या आर्थिक वर्षात काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबई-दिल्ली या मार्गावर धावणार आहे.
मुंबई ते दिल्ली रेल्वेमार्गाने जाण्यासाठी 16 तास लागतात. मात्र ते अंतर कमी करुन 12 तासांवर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रकल्पाला 2017 ते 18मध्ये मंजूरी मिळाली होती. यासाठी मुंबई आणि दिल्लीदरम्यान रेल्वे रूळांची मजबूती, पुल दुरुस्त करणे, ओएचई मॉर्डनायजेशन करणे, संपूर्ण रेल्वे रुळांवर कवच प्रणाली स्थापित करणे, रुळांवरुन दोन्हीकडून काम केले जाणार आहे. रुळांवरुन रेल्वे 160 किमी ताशी वेगाने धावण्याचे उद्दिष्ट्य आहे.
मुंबई सेंट्रल ते नगादादरम्यान 694 किमीपर्यंत काम सुरू आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रलहून नगादा व्यतिरिक्त बडोदा ते अहमदाबादपर्यंत १०० किमीपर्यंतही काम करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी 3,227 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. 195 किमीपर्यंत संरक्षण भिंतदेखील बांधण्यात येत आहे. यातील 30 किमीपर्यंतचं काम पूर्ण झाले आहे. मुंबई ते अहमदाबाद या 570 किमीपैकी 474 किमीचे मेटल बॅरियर फेन्सिंगचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय पश्चिम मध्य रेल्वे नागदा ते मथुरा या ५४५ किमीवर काम करत आहे. यासाठी 2,664 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. उत्तर मध्य रेल्वे मथुरा ते पलवल 82 किमीचे काम करत आहे आणि पलवल ते दिल्ली दरम्यान 57 किमीचे काम उत्तर रेल्वे करत आहे.
रेल्वे प्रशासनाने ICFकडे 86 वंदे भारत ट्रेन बनवण्याचा करार केला आहे. यातील 9 ट्रेन स्लीपर असतील. स्लीपर व्हर्जनचे लवकरच प्रोटोटाइप तयार करण्यात येतील. याचबरोबर येत्या चार वर्षांत रेल्वे 400 वंदे भारत एक्सप्रेस देशभरात चालवण्यात येणार आहे. यात वंदे भारत सिटिंग व्हर्जन, वंदे भारत स्लीपर व्हर्जन आणि वंदे भारत मेट्रो व्हर्जन आहेत. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (MRVC) EMU लोकल ट्रेनऐवजी वंदे भारत मेट्रोसाठी निविदा दस्तऐवज अपलोड करत आहे. आणखी 240 वंदे भारत स्लीपर गाड्यांची निविदा लवकरच ICF कडून देण्यात येईल. या गाड्या राजधानी आणि दुरांतो मार्गावर धावतील.