Former NCP Corporator Pune Died In Shooting: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाना पेठे येथे रविवारी रात्री त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं असता मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान वनराज आंदेकर यांच्या हत्येमागे बहिणींचाच हात असल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली असून यामध्ये त्यांच्या बहिणी आणि भावोजींचा समावेश आहे.
पुणे पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. यामध्ये वनराच्या सख्ख्या दोन बहिणी आणि मेहुण्यांचा समावेश आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास वनराज यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. अखेर याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जयंत कोमकर, गणेश कोमकर, संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर अशी अटक करण्यात आलेल्या सख्खे भावीजो आणि बहिणींची नावं आहेत.
रविवारी रात्री पोलिसांनी या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. "आज रात्री साडेनऊच्या सुमारास वनराज आंदेकर (अजित पवारांच्या पक्षाचे माजी नगरसेवक) हे त्यांच्या चुलत भावाबरोबर इनामदार चौकात उभे होते. त्यावेळे काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एकूण 5 गोळ्या झाडण्यात आल्या. घटनास्थळावरील प्राथमिक पहाणीनुसार या दोघांवर धारधार शस्त्रांनीही हल्ला करण्यात आला," असं सह-पोलीस आयुक्त शर्मा यांनी सांगितलं.
याप्रकरणी तीन ते चार संशयितांची नावे पोलिसांच्या हाती लागली आहेत. नाना पेठेतील डोके तालीम परिसरात आंदेकर उभे असताना हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या त्यांच्यावर झाडल्या. त्यानंतर या दोघांवर कोयत्याने हल्ला केला. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. याचा हल्ल्याशी काही संबंध आहे या याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.