Raj Thackeray And Uddhav Thackeray News: मागील काही महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षवेधी घडामोडी घडत आहेत. त्यातच ठाकरे बंधूंनी एकत्र येणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याची चर्चा आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट होणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात राज ठाकरेशी उद्धव ठाकरे संवाद साधण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी 1990च्या पूर्वीची बाळासाहेब ठाकरे यांची भाषण संग्रहित केलेली होती. त्या वेळी टीव्ही नसल्यानं भाषणं ग्रामोफोन मध्ये रेकॉर्ड केली जात असतं. 1990 पूर्वीची बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं जर राज ठाकरेंकडे असतील तर त्यांच्याशी उद्धव ठाकरे संवाद साधण्याची शक्यता आहे. या संवादाच्या माध्यमातून दोन्ही ठाकरे बंधूंची मनं जुळणार का? यावरून तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन प्रमुख चेहरे. एक शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख. तर, दुसरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष. रक्ताच्या नात्यानं एकमेकांचे चुलतबंधू. मात्र, भाऊबंदकीच्या वादातून हे दोघे भाऊ राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी बनले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार का? अवघ्या महाराष्ट्राला हा प्रश्न पडलेला आहे. यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत.
राज ठाकरे सोबत युती करण्याच्या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली. आधार असता तर चर्चा थांबली नसती असं त्यांनी म्हटलंय. चर्चेचा प्रस्ताव आला तर गेला तर याचा विचार करत नाही. सध्या तरी असा प्रस्ताव नाही, त्यामुळे विचार करण्याची गरज नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंसोबत जाण्याबाबत प्रश्नावर राज ठाकरे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली नाही. अनेकदा राज ठाकरे यांनी मिश्किल टोलेबाजी करत या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले आहे.