जितेंद्र शिंगाडे, नागपूर : नागपुरात पारा सध्या ४५ अंशांवर येऊन ठेपल्यानं त्याचा परिणाम सामान्य जनजीवनावरही पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर उष्णता वाढल्यानं डांबरी रस्त्यांवरही त्याचे परिणाम दिसून येत आहेत.
नागपूरच्या आकाशवाणी चौकात काही आठवड्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आलं. मात्र हे डांबरीकरण करताना आवश्यक असलेल्या खडीचं मिश्रण न करता केवळ डांबरच रस्त्यावर टाकण्यात आलं. कमालीच्या उष्णतेमुळे हे डांबर आता बऱ्याच प्रमाणात वितळत असल्यानं, चौक पार करताना पायी चालणाऱ्यांची चांगलीच कसरत होत आहे. चपला डांबरी रस्त्याला चिकटत आहेत, तर वाहनांच्या टायरचे ठसेही रस्त्यावर उमटत आहेत.
दिवसाच नाही तर रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक काम असेल तरच नागरिक घराबाहेर पडत आहेत. तर दही, लस्सी,लिंबूपाणी यासारख्या उपायांनी शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न नागरिक करत आहेत.
नागपूरसह विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे यंदा मे महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक राहणार हे निश्चित.