Kalyan Crime News: सावत्र मुलानेच वडिलांची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. टिटवाळा येथील बल्याणी येथे ही घटना घडली आहे. सावत्र बापाची बहिणीवर वाइट नजर असल्याच्या संशयातून त्याने ही हत्या केली आहे. हत्येच्या 12 तासांच्या आतच पोलिसांनी या या घटनेचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. कबीर सिद्दिकी आणि त्याचा मित्र अलताफ शेख अशी आरोपींची नावे आहेत. तर, कदीर सिद्दीकी असं सावत्र बापाचे नाव होते.
टिटवाळा येथील बल्याणी गावात हार्डवेअरच्या दुकानात कदीर सिद्दीकी काम करत होता. रविवारी रात्री त्याची हत्या करण्यात आली होती. कदीरची आरोपीच्या बहिणीवर वाईट नजर होती, असा संशय त्याला होता. त्यामुळं बहिणीला पुढे जाऊन तो त्रास देईल किंवा तिच्यासोबत काही दुष्कृत्य करेल अशी भिती कबीरला होती. त्याच संशयातून त्याने त्याचा काटा काढण्याचे ठरवले.
आरोपीने कदीरवर धारदार शस्त्राने वार केले. यातच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूची सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांचा सुरुवातीपासूनच कबीरवर संशय होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेताच त्याने गुन्हा कबूल केला आहे. चुलत भाऊ अलताफ शेख याच्या मदतीने त्याने सावत्र बापाची हत्या केली अशी कबुली त्याने दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी कादीरने त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेसोबत लग्न केले होते. या महिलेला पहिल्या पतीपासून दोन मुलं होती. आरोपीची चौकशी करताना समोर आले की, सावत्र बापाची मुलीवर वाईट नजर होती. त्यामुळं त्याने त्याची हत्या करण्याचे ठरवले. कदीरची हत्या झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 12 तासांच्या आत आरोपीला शोधून काढले आहे.