पुणे : सिंहगड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. एम. एन. नवले यांना संस्थेच्या विश्वस्त पदावरून हटविण्यात आले आहे. नवले यांनी सात दिवस तुरुंगवास भोगल्यामुळे त्यांचे विश्वस्तपद रद्द करण्यात आले आहे. एखाद्या संस्थेच्या विश्वस्तास न्यायालयाकडून शिक्षा ठोठावल्यानंतर आणि संबंधित व्यक्तीला तुरुंगात कारावास भोगावा लागला तर अशा व्यक्तीचे विश्वस्तपद रद्द करण्याचा अधिकार धर्मदाय आयुक्त कार्यालयाला आहे आहे. तसेच प्राध्यापकांच्या वेतन प्रश्नावरून सिंहगड इन्स्टिट्यूट चर्चेत आहे. त्यातच नवले यांनी मुलाच्या लग्नात लाखो रुपये खर्च केले. मात्र, शिक्षकांचे पगार दिले नव्हते यावरुन आरोप होत होते. मुलाच्या लग्नात खर्च करण्यासाठी पैसे आहेत, परंतु शिक्षकांना पगार देण्यासाठी पैसे नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया काही शिक्षकांनी व्यक्त केली होती.
महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टनुसार नवलेंच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. अध्यक्ष आणि ट्रस्टी अशा दोन्ही पदांवरुन नवले यांना हटवण्याचा निर्णय करण्यात आला आहे. नवले यांना ४ फेब्रुवारीपर्यंत उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी सुमोटो दखल करुन घेत नवले यांच्या विरोधात सुनावणी सुरु केली होती. अशा प्रकारे धर्मादाय आयुक्तांनी एखाद्या संस्थेचे अध्यक्ष आणि विश्वस्त पद रद्द करण्याचा पहिलाच निर्णय आहे. नवले सात दिवस जेलमध्ये राहील्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
सिंहगड इन्स्टीट्यूटच्या शेकडो प्राध्यापकांचे पगार दोन वर्षांपासून थकलेत. मात्र मुलाचा विवाह सोहळा थाटामाटात पार पाडला. मुलाचा शाही विवाह करून नवले प्राध्यापकांच्या जखमेवर कसे मीठ चोळल्याचा आरोप करण्यात आला. या लग्नाची पत्रिकाही अती महागडी होती. एकीकडे शिक्षक २ वर्षे उपाशी असताना रोहित नवलेच्या लग्नपत्रिकेसह सुका मेवा, महागडी अत्तरं, भेटवस्तू दिल्या आहेत. एकीकडे शिक्षक उन्हातान्हात आंदोलन करत असताना नवल्यांच्या मुलाचं प्रीवेडींग शूट इटलीत झाले. त्यामुळे शिक्षकांना देण्यासाठी पैसे नसताना आता या उधळपट्टीला नवल्यांकडे पैसे कुठून आले असा प्रश्न विचारला गेला होता. मात्र, शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न अनुत्तरी होती. त्यामुळे शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, २१ एप्रिल २०१७ रोजी पुण्यातल्या सिंहगड इन्स्टिट्यूटवर सीबीआयने छापे टाकले होते. कर्ज अपहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. संस्थेचे संचालक मारुती नवले यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला होता. त्यामुळे नवले हे वादात सापडले होते. सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारूती नवले यांनी सेंट्रल बँकेकडून घेतलेले 75 कोटी रुपये बेकायदेशीरित्या दुसरीकडे वर्ग केल्याचा आरोप होता. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. तसेच नवले यांच्या बँक खात्यांची आणि लॉकर्सचीही तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.