ठाण्याचा बालेकिल्ला आता केदार दिघेंच्या हाती; शिवसेनेकडून जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

ठाण्यात एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे

Updated: Jul 31, 2022, 06:44 PM IST
ठाण्याचा बालेकिल्ला आता केदार दिघेंच्या हाती; शिवसेनेकडून जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती title=

Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknat Shinde) यांनी ४० आमदारांसह शिवसेनेतून (Shivsena) बंड केल्यानंतर ठाण्यात मोठ्या प्रमाणात राजकारणाला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांची मजबूत पकड असलेल्या ठाण्यात त्यांच्याविरुद्ध आव्हान उभं करण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरु केले आहेत.

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण बाहेर पडल्याचे एकनाथ शिंदे यांनी वारंवार म्हटले आहे. यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे.

एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु असलेल्या आनंद दिघे (kedar dighe) यांचे पुतणे असणाऱ्या केदार दिघे यांनाच शिवसेनेने मैदानात आणलं आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी ही माहिती दिली आहे. केदार दिघे यांच्या नियुक्तीनंतर ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्हा प्रमुख पदी केदार दिघे यांची नियुक्ती केली आहे. तसेच अनिता बिर्जे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रदीप शिंदे यांच्यावर ठाणे शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर केदार दिघे यांनी जोरदार टीका केली होती. "दिघे साहेबांची शिकवण असलेल्या नेत्याकडून असं होणं अपेक्षित नाही. दिघे साहेब असते, तर असं घडलंच नसतं. त्यांनी संघटनेशी गद्दारी सहनच केली नसती. एकनाथ शिंदे १०० टक्के चुकले आहेत," अशी प्रतिक्रिया केदार दिघे यांनी दिली होती.

दरम्यान, खासदार राजन विचारे यांच्यासह केदार दिघे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी आपण कार्यकर्त्यांसह आल्याचे राजन विचारे यांनी म्हटले.