ज्या महाविकास आघाडीने भाजपाला दिल्लीतून बहुमतमुक्त केलं ती महाराष्ट्रातही एकत्रित ताकदीने लढेल असा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसंच आम्ही 180 ते 185 जिंकू असा विश्वासही व्यक्त केला आहे. शिवसेना भवनात आज ठाकरे गटाची बैठक सुरु आहे. या बैठकीसाठी जिल्हाप्रमुख, नेते, आमदार, खासदार यांच्यासह मुंबईचे विभागप्रमुखही उपस्थित आहेत. आगामी निव़डणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंकडून त्यांचं मार्गदर्शन केलं जात आहे. ही बैठक सुरु असून, संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
"भाजपा आणि त्यांच्या इतर मित्रमंडळींना रोखण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींचं बहुमत कमी करण्यात किंवा भाजपाला बहुमतमुक्त करण्यात महाराष्ट्राचं, महाविकास आघाडीचं मोठं योगदान आहे. शिवसेना भवनात आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, नेते, आमदार, खासदार यांची बैठक सुरु आहे. यावेळी संघटनात्मक बांधणीवर जोर देण्यासंदर्भात चर्चा झाली," अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
"विधानसभा निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित ताकदीने लढू आणि महाराष्ट्रातील सत्ता काबीज करु. जिल्हाप्रमुखांना संघटनात्मक बांधणी अधिक ताकदीने होणं गरजेचं आहे, त्यासाठी कामाला लागा असं सांगितलं आहे. 288 मतदारसंघात संघटनात्मक बांधणी होणं गरजेचं आहे. यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्याच्या तयारीचा आढावा आज घेण्यात आला आहे," असं संजय राऊतांनी सांगितलं.
ज्या महाविकास आघाडीने भाजपाला दिल्लीतून बहुमतमुक्त केलं ती महाराष्ट्रातही एकत्रित ताकदीने लढेल. 180 ते 185 जागा जिंकू असा निर्धार आम्ही केला आहे असंही संजय राऊत म्हणाले. तसंच पावसाळा असल्याने बंद दाराआड सगळ्या चर्चा सुरु असून त्या महाराष्ट्रभर होतील असं सांगितलं.