शिरुर : पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांना काही अज्ञात व्यक्तींकडून शुक्रवारी पहाटे धमकवण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणी तहसीलदार लैला शेख यांच्या तक्रारीनंतर रात्री उशीरा, शिरूर पोलिसांनी अज्ञात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बेकायदा माती उत्खनन आणि वाळूउपशायावर कारवाई करण्यासाठी निघाल्या असता, शेख यांच्या सरकारी निवासस्थानी हा प्रकार घडला. त्यामुळे वाळूमाफियांना खाकी वर्दीचा धाक आहे की नाही असाच प्रश्र आता निर्माण झाला आहे.
शिरुर तालुक्यात नदीपात्रात मोठया प्रमाणात अवैधरीत्या वाळूउपसा चालू आहे. शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असून नदीपात्राची अक्षरशः चाळण झालेली आहे. कारवाई करुनही अवैध वाळू उपसा थांबण्याचं नाव घेत नाही.