Santosh Deshmukh Murder : बीडच्या केज तालुक्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्यासंदर्भात SIT ने मोठा खुलासा केलाय. देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एसआयटीचे प्रमुख तपास अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिकचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग आहे याचा पुरावाच कोर्टात सादर केला. ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या दिवशी दुपारी सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिकचे फोन वरून चर्चा झाली असल्याची माहिती SIT ने कोर्टात दिली. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक पुरता अडकल्याचं म्हटलं जातं.
SIT ने कोर्टात सांगितलं की, 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4 च्या दरम्यान संतोष देशमुख यांचे अपहरण झाले. त्यापूर्वी दुपारी 3.20 ते 3.40 वीस मिनिटं घुले, चाटे आणि कराड या तिघांमध्ये संवाद झाला. सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक हे फोन वरून एकमेकांशी संवाद साधला.
वाल्मिक कराडनेच संतोष देशमुख यांना हत्येच्या दिवशी धमकी दिली, अशी माहिती SIT ने कोर्टात दिली. मुख्य आरोपी आणि वाल्मिक कराड यांच्यात काय बोलणे झाले याचा आम्हाला तपास करायचा आहे, असे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टात सांगितलं. त्यासाठी वाल्मिक कराडची 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी त्यांनी केलीय.
याआधी हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. मकोका लावण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सुधीर घुले, प्रतिक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे.
दरम्यान वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केलाय. कुठल्याही आरोपींने कराडचे नाव घेतले नाही, असा युक्तिवाद आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंने कोर्टात केला.