प्रफुल्ल पवार, झी मीडिया, प्रतिनिधी रायगड : कोकणात पुन्हा मोठया प्रमाणात पुन्हा प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. केंद्र सरकारच्या भारतमाला प्रकल्पाअंर्गत अलिबाग जवळील मांडवा किनारी मोठे प्रवासी टर्मिनल उभे रहात आहे. या टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या मे महिन्यापर्यंत येथून रो-रो सेवा सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
एकेकाळी कोकणात प्रवासी आणि मालाची वाहतूक करण्याचं जलवाहतूक हे एकमेव साधन होतं. आधी बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीमार्फत आणि नंतर चौगुले स्टीम नेव्हिगेशन या कंपनीमार्फत जलवाहतूक सुरू होती. मुंबईतल्या भाऊचा धक्का ते अगदी गोव्यापर्यंत या बोटी जात होत्या. पण पुढे गावागावात रस्त्यांचं जाळं विणलं गेलं, एसटी प्रवासी वाहतूक सुरू झाली आणि १९७२ च्या सुमारास प्रवासी जलवाहतूक बंद पडली. आता केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत देशातल्या १४ राष्ट्रीय जलमार्गांना मंजुरी मिळालीय. त्यात कोकणचाही समावेश आहे.
सागरमाला प्रकल्पातला पहिला टप्पा म्हणून मुंबईतील भाऊचा धक्का ते मांडवा अशी रो - रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मांडवा इथं प्रवासी टर्मिनल, जेट्टी, ब्रेक वॉटर तयार करण्याचं काम दिवसरात्र सुरू आहे. जवळपास १३५ कोटी रूपये खर्च करून हा प्रकल्प उभा राहतोय. यामुळे मुंबईहून अलिबागला येणारे प्रवासी आणि पर्यटकांना आपली वाहने जलमार्गे आणणे शक्य होणार आहे.
सध्या कोकणात गेट वे ते मांडवा, भाउचा धक्का ते रेवस, आगरदांडा ते दिघी, वेश्वी ते बांगमांडला, दाभोळ ते धोपावे, जयगड ते तवसाळ अशा जलमार्गांवर फेरीबोट सेवा सुरू आहे. परंतु थेट मुंबई ते कोकण जलमार्गानं जोडण्यात अनेक अडचणी आहेत. अलीकडेच मुंबई ते दाभोळ अशी फेरीबोट प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली होती परंतू अपेक्षित यश न मिळाल्याने ती बंद करावी लागली.
केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पामुळे कोकणात जलवाहतूकीचे नवे पर्व सुरू होणार असले तरी या सेवेला सरकारचे थेट सहकार्य मिळाले नाही तर रस्ते आणि कोकण रेल्वेच्या तुलनेत ती मागे पडण्याची भीती व्यक्त होत आहे.