मुंबई : अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत यश संपादन करणाऱ्या मान्यवरांच्या यशोगाथा आपण वाचतच असतो. अनेकांनी कठीण परिस्थितही आपले ध्येय गाठले आहे. ध्येयाचा पाठलाग करताना सातत्याची कास धरली आहे. महाराष्ट्रात असंख्य विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहेत. अशांसमोर प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजेच रमेश घोलप होय.
सोलापूरातील रमेश घोलप हा गरीब कुटूंबातील विद्यार्थी होता. घरच्या गरीबीच्या परिस्थितीवर मात करीत त्याने युपीएससीच्या सिविल सर्विस परिक्षेत घवघवीत यश मिळवले. रमेश घोलप आय ए एस झाले. त्याआधी त्यांच्या वडिलांचे सायकलचे दुकान होते.
अतिमद्यप्राशनाने रमेश यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटूंबाची जबाबदारी रमेश यांच्यावर येऊन पडली. रमेश आईबरोबर शेजारच्या गावात जाऊन बांगड्या विकत असे. याचवेळी काळानेही रमेश यांचा घात केला. त्यांना पोलिओ झाला. त्यात त्यांचा एक पाय अधू झाला.
रमेश यांचा शिक्षणातील रस पाहता त्यांना त्यांच्या काकांकडे शिक्षणासाठी ठेवण्यात आले. 2009 सालानंतर त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. नोकरीत मन रमत नव्हते म्हणून त्यांनी नोकरी सोडली. आय ए एस परीक्षेची तयारी केली. या परीक्षेसाठी देशपातळीवर अत्यंत हुशार विद्यार्थ्यांशी स्पर्धा असते. परंतु रमेश यांनी मोठी संयमाने, जिद्दीने आणि नियोजनानुसार अभ्यास केला. आणि आयएएसची परीक्षा उत्तीर्ण झाले. रमेश आज सनदी अधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती झारखंडला झाली आहे.