अरुण मेहेत्रे, झी 24 तास, पुणे: अवघ्या दोन पावसात पुण्याची दाणादाण उडाली... हाहाकार म्हणावा अशी परिस्थिती पुणेकर गेले चार-सहा दिवस अनुभवताहेत. पुणे शहराला जणू कुणी वालीच नाहीये अशी आज अवस्था आहे. त्यामुळे पुणेकरांचे हाल कोण थांबवणार हा प्रश्न कायम आहे.
4 जून 2024 रोजी धानोरी, लोहगाव, वडगाव शेरी परिसरात पाणीच पाणी साचले होते. यानंतर 6 जून 2024 रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर सिंहगड रोड, वारजे परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पुढे अवघ्या 4 दिवसातच पुन्हा पाऊस आला.8 जून 2024 ला मध्यवर्ती पेठा, डेक्कन, शिवाजीनगरमध्ये पाणी साचले होते. दिवसाआड झालेला ढगफुटी सदृश पाऊस आणि त्याचा हा परिणाम असल्याचे म्हटले जाते. आता कुठे पावसाळा सुरु झालाय. अजून 3-4 महिने पाऊस पडेल. तरीही कुणाच्या घरात कमरेइतकं पाणी, तर कुणाच्या वस्तीत गुडघाभर पाणी साचले होते.
शहरातील रस्त्यांना ओढ्या नाल्याचं स्वरूप, तर रस्त्यावरील वाहनांना पाण्याचा वेढा...या सगळ्या परिस्थितीत दुर्देवी पुणेकर जीव मुठीत धरून सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. घरांचे नुकसान, वस्तूंचे नुकसान, वाहनांचे नुकसान, वाहतूक कोंडी, चीडचीड... आणि या सगळ्यातून येणारा मनस्ताप तर वेगळाच आहे.
पावसाळा सुरू होण्याच्या आधी काही कामं पूर्ण करावी लागतात. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असते. पुण्यामध्ये प्रशासन नावाची ती यंत्रणा नेमकी काय करते असा प्रश्न आज उपस्थित झालाय, अशी प्रतिक्रिया सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी दिलीय.
रस्त्यावर किंवा सखल भागात पाणी साचणे ही अगदी सामान्य समस्या बनलीय. पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होत नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी म्हणून पाठ थोपटून घेणारं शहर एका दिवसात जलमय पुणे बनतं...त्यातच भर म्हणून कधी कुठल्या झाडाची फांदी डोक्यावर पडेल आणि जागच्या जागी जीव गमवावा लागेल याचा नेम नाही...पुणेकरांचे हाल होण्याला सत्ताधारी जबाबदार असल्याचं घोटीव उत्तर विरोधकांकडून मिळतं. प्रशासन काम करत नसल्याचा थेट संबंध महापालिका निवडणुका न होण्याशी जोडला जात आहे. खरं सांगायचं तर या पुणे शहराचं आणि इथल्या जनतेचं कुणालाच काही पडलेलं नाही... हे जळजळीत वास्तव आहे.