कोल्हापुरात कारागृहाच्या कर्मचाऱ्याने भेदली सुरक्षा;सुभेदाराकडे आढळला 23 हजारांचा गांजा

कोल्हापुरातील कळंब कारागृहातील कर्मचाऱ्याकडे गांजा सापडल्याने खळबळ उडाली आहे. कैंद्यांना हा गांजा पुरवला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Updated: Jul 28, 2023, 11:28 PM IST
कोल्हापुरात कारागृहाच्या कर्मचाऱ्याने भेदली सुरक्षा;सुभेदाराकडे आढळला 23 हजारांचा गांजा  title=

Kolhapur Crime News : कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये कार्यरत असणाऱ्या एका सुभेदाराकडेच सुमारे अडीच किलो गांजा सदृश्य अमली पदार्थ सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारागृहाच्या कर्मचाऱ्याकडेच अंमली पदार्थ सापडल्याने कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारागृहाच्या या कर्मचाऱ्याला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी सुरू केली आहे. हा गांजा कुठून आणला? हा गांजा कोणाला पुरवला जाणार होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासात समोर येतील. 

शिपायानेच केली तक्रार

गेल्या काही दिवसांपासून कळंबा कारागृहामध्ये मोबाईल सिम कार्ड आणि गांजा सदृश्य अमली पदार्थ आढळून येत होते. मात्र आज कारागृहाच्या कर्मचाऱ्याकडेच अंमली पदार्थ मिळून आले आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. 55 वर्ष बाळासाहेब भाऊ गेंड असे या सुभेदाराचं नाव असून जुना राजवाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याबाबतची फिर्याद कारागृहाचे शिपाई महेश दिलीप देवकाते यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. 

झडती घेत असताना सापडला गांजा

कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झडती घेत असताना सुभेदार यांच्याकडे 1 हजार 710 रुपये किमतीचा 171 ग्राम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ सापडला आहे. हा गांजा प्लास्टिक पिशवी आणि त्यावर खाकी टेप लावून पॅकिंग मध्ये होता. पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर संशयीत गेंड याच्या कळंबा येथील घराची झडती घेतली असता या घरात 23 हजार 250 रुपये किमतीचा 2 किलो 325 ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ आणि 50 हजार 500 रुपयांची रोकड असा एकूण 73 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे कळंबा कारागृहात प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वी कैद्यांकडे गांजा आणि मोबाईल सापडत होता मात्र आता कारागृहाच्या सुभेदाराकडेच अमली पदार्थ मिळून आल्याने कळंबा कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे.

पुण्याच्या येरवडा जेलमध्ये कैद्याकडे सापडला मोबाईल

पुण्याच्या येरवडा जेलमध्ये कैद्याकडे मोबाईल सापडला होता. अश्विन चव्हाण असं कैद्याचं नाव असून, त्याच्याकडे मोबाईल सापडल्याने येरवडा जेलच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे. या आरोपीला आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी पिंपरी चिंचवड शहरात झाड फेकून पकडलं होतं. या कैद्यांना येरवडा जेलमधील सर्कल क्रमांक एक, बॅरेक क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आले. मात्र, त्यांच्याकडे मोबाईल सापडल्याने हा मोबाईल कसा आला? जेलमध्ये कैद्यांना मोबाईल कोण पुरवतंय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.