योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : बातमी तुम्हाला सावध करणारी. मॅजिक बॉल (Magic Ball) गिळल्यानं एका दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू (Death) झाला. धक्कादायक म्हणजे हा मॅजिक बॉल त्या चिमुकल्याला त्याच्या वडलांनीच गिळायला दिला होता. काय आहे हा सगळा प्रकार पाहुयात. (one and a half year old boy dies after swallowing magic ball in nashik)
तुमच्या मुलाला जर मॅजिक बॉल खेळायला देत असाल तर सावधान. कारण नाशिक शहरात एका अठरा महिन्यांच्या चिमुरड्याचा मॅजिक बॉल गिळल्यानं मृत्यू झाला. शिवांश असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे शिवांशचा जीव घेण्यासाठीच त्याच्या वडिलांनी. संकेत बोराडेनं त्याला हा मॅजिक बॉल दिला होता, असं तपासात समोर आलंय. संकेत आणि त्याची पत्नी शीतल यांच्यात वाद होत होता, त्याच वादातून संकेतने मुलगा शिवांशचा मॅजिक बॉल देऊन खून केला. पत्नी शीतल यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी तपास केला आणि तब्बल 6 महिन्यांनी हा गुन्हा उघड झाला.
धक्कादायक म्हणजे वडील संकेत बोराडे हे वैद्यकीय क्षेत्रात कामाला असल्यानं त्यांना या मॅजिक बॉलनं मुलाचा मृत्यू होऊ शकतो याची माहिती होती. मॅजिक बॉल गिळल्यानं शिवांशला अस्वस्थ वाटू लागलं, त्याची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी नलिकेतून मॅजिक बॉल काढला पण शिवांशचा जीव वाचू शकला नाही.
आई-वडलांच्या भांडणात वडलांनी क्रूरतेचा कळस गाठला आणि पोटच्या पोराला संपवलं. तेही खेळण्यातला मॅजिक बॉल देऊन.. पण त्यानिमित्तानं मॅजिक बॉल लहान मुलांसाठी कसे जीवघेणे ठरु शकतात हेही समोर आलंय.