Latur NEET Scam: गुणवत्तेचा लातूर पॅटर्न राज्यभर परिचित आहे. या पॅटर्नमध्ये स्वप्न उराशी बाळगून राज्यभरातील विद्यार्थी लातूर मध्ये येतात. गुणवत्तेसाठी असलेली जीवघेणी स्पर्धा आणि त्यातून उभी राहिलेली क्लासेसची फॅक्टरी असे लातूरचे समीकरणं बनत चाललं आहे. याच लातूर पॅटर्नला छेद देणाऱ्या आत्तापर्यंत अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. त्यामुळे लातूरचा शिक्षणाचा पॅटर्न अनेक कारणाने डागाळला. लातूरमध्ये ‘नीट’ शिकवण्यांची हजार कोटींची बाजारपेठ आहे. पुस्तकांची आणि लेखन साहित्याच्या बाजारपेठेची उलाढाल 700 कोटी रुपये इतकी आहे. कसा सुरू झाला लातूर पॅटर्न सुरू? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
लातूरचा टिवशेन विभाग शिक्षणासाठी ओळखला जातो. इथं हजारो विद्यार्थी येतात कोणी डॉक्टर तर कोणी इंजिनिअर व्हायचं स्वप्न पाहत असतो. ही स्वप्न या क्लासमध्ये पूर्ण होतात असा त्या विद्यार्थ्यांना विश्वास आहे. या विश्वासाची कारणंही तशीच आहेत . कारण लातूर पॅटर्नचा अवघ्या देशभर डंका वाजलाय. नागपूरचा विद्यार्थी असो की मुंबईचा..'नीट' साठी सारे लातूरलाच प्राधान्य देतात. या पॅटर्नच्या पुण्याईवर ही सगळी इंडस्ट्री उभी राहिलीय. मात्र काही गोष्टी अशा समोर आल्यायत की या इंडस्ट्रीला आता घरघर लागेलीय की काय? अशीच भीती वाटतेय. याचं कारण सध्याचा नीट चा घोटाळा आणि त्यावरून झालेले गंभीर आरोप. पैसे देऊन जर अशा पद्धतीने नीटची परीक्षा पास केल्या जात असतील आणि याचं कनेक्शन लातूरशी असेल तरा या क्लासेसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहतं.
देश आणि राज्याला सर्वाधिक डॉक्टर देणारा जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे. भविष्याची स्वप्न घेऊन राज्यभरातील मुले स्वतःचं करिअर घडविण्यासाठी येत असतात. विद्यार्थ्यांमध्ये सुरू झालेली गुणवत्तेची स्पर्धा पाहता यांचाच फायदा घेऊन पडद्यामागे सुरू असलेल्या घटना समोर आल्या.
तात्कालिन दिवंगत मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मुलीला वैद्यकीय कॉलेजला प्रवेश मिळवण्यासाठी तिच्या गुणपत्रिकेतील मार्क्स वाढवण्यात आल्याचा आरोप त्या काळात करण्यात आला. येथे लातूर पॅटर्नला धक्का देणारी पहिली घटना घडली. हे प्रकरण राज्यभर गाजले. मुंबई उच्च न्यायालयातदेखील मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढण्यात आले. या आरोपांमुळे व्यथित झालेल्या शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी थेट मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. लातूरच्या पॅटर्नवर त्याकाळात शंका कुशंका घेण्यात आली. अशा स्पर्धेतून रक्तरंजित घटनाही घडल्या. क्लासेस चालकाच्या खूनाने लातूर हादरले. गुणवत्तेची स्पर्धा जिवावर उठण्यापर्यंत गेली आणि पुन्हा 30 वर्षांपासून गाजलेल्या पँटर्नला तडा गेला. हे चित्र बदलेल असे वाटत असताना गुणवत्तेच्या अस्तित्वात प्रश्न निर्माण करणार्या नीट घोटाळ्याने अनेकांची झोप उडाली.
भविष्याची स्वप्न घेऊन शेकडो विद्यार्थी करिअर घडविण्यासाठी पोहचू लागले. देश, राज्याला सर्वाधीक डॉक्टर देणार्या लातूर पँटर्नची स्पर्धा नीटच्या घोटाळ्याने बदनाम होईल असे कोणाला स्वप्नातही वाटले नसेल. मात्र या नीटच्या घोटाळ्याचे कनेक्शन समोर आल्याने गुणवत्तेसाठीच्या बोगसगिरीने लातूर पँटर्नवरच शंका निर्माण केली आहे.त्यामुळे क्लासेसच्या फँक्ट्रीसह लातूरच्या उद्योगभवनात उभ्या राहिलेल्या उद्योगांचे काय होणार? असा प्रश्न आहे. कोट्यावधींची गुंतवणूक आणि होणाऱ्या उलाढालीवर परिणाम होईल की काय? याचीच चिंता अनेकांना सतावत आहे. शिक्षणामुळे चांगल्या-वाईटातील फरक ओळखण्यास आपल्याला मदत होते. सध्या सुरु असलेला शिक्षणाचा ‘लातूर पॅटर्न’ कोणत्या वळणावर जाऊन थांबणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.