'निसर्ग'चा फटका बसलेल्या सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करा- शरद पवार

अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु...

Updated: Jun 10, 2020, 06:03 PM IST
'निसर्ग'चा फटका बसलेल्या सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करा- शरद पवार
संग्रहित फोटो

दीपक भातुसे, झी मीडिया, रत्नागिरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी, निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणचा पाहाणी दौरा केला. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात घरांचं मोठं नुकसान झालं आहे. घरांसह, आंबा, नारळ, सुपारीच्या बागांचं, शेतीचं अतिशय नुकसान झालं आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करा, असं शरद पवार यांनी पाहाणी दौऱ्यानंतर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत सांगितलं आहे.

चक्रीवादळात अनेक झाडांची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु असल्याचं पवार म्हणाले.

'यंत्रणा अजून सगळीकडे पोहचली नाही, आताचा अंदाज प्राथमिक अंदाज आहे. नारळ, सुपारीबरोबर मसाल्याची पिकंही घेतली जातात, त्यांचंही नुकसान झालं आहे, त्यांसाठी मदत करावी लागेल. सांगली, कोल्हापूर पुरावेळी सरकारने काही धोरणात बदल केले होते, त्यातही यावेळी बदल करावे लागतील. शेती, घरं, व्यवसाय याच्या मदतीच्या निकषात बदल करायला हवेत, तसं सरकारला सूचवणार आहोत.' 

बागांच्या नुकसानीसाठी मदत देताना पुढील सहा ते सात वर्षांचा विचार करुन द्यावा लागेल. कारण हे पिक एका दिवसात उभं राहत नाही, यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी बोलणार असल्याचंही पवार म्हणाले. 

निसर्ग चक्रीवादळ : उद्धव ठाकरे- शरद पवारांमध्ये पुन:श्च बैठक

 

रोजगार हमीतून फळबागा असा कार्यक्रम राबवला होता, आज बागा उद्‌ध्वस्त झाल्या आहेत त्यामुळे पुन्हा जुनी रोजगार हमी योजना राबवता येऊ शकते. कारण बागा साफ करायलाही त्याच्याकडे पैसा नाही. राष्ट्रीयीकृत बँकाचं कर्ज काढल्याचं अनेक लोकांनी सांगितलं आहे. अशा कर्ज काढलेल्या लोकांची, गावांनी यादी करावी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनीकडे द्यावी, यानंतर केंद्राची मदत घेऊन बँकांसमोर हा विषय मांडता येऊ शकत, असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

एवढं संकट येऊनही लोकांनी धीर सोडला नाही, ते पुन्हा कामाला लागले आहेत. राज्याची यंत्रणा या संकटात लोकांच्या मागे उभी राहिल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. 

'निसर्ग'च्या प्रकोपात घरांची पडझड झालेल्यांना मिळणार इतकी आर्थिक मदत

मत्स्य व्यवसायाची स्थितीही बिकट आहे, कोरोनामुळे २ महिने व्यवसाय थांबला होता. आता वादळात बोटी, जाळी, इंजिनाचे नुकसान झाले आहे. त्यांनाही मदत करायला हवी, त्याबाबतही राज्य सरकारशी बोलणार असून, या संकटातून यातून आपण बाहेर पडू, सरकार मदत करेल, अशी आशा व्यक्त केली आहे.