गणवेशातल्या पोलिसाची दारू पार्टी, नाशिकमधला व्हिडिओ व्हायरल

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलीस ड्रंक अँड ड्राइव्ह मोहीम अत्यंत काटेकोरपणे राबवत आहेत.

Updated: Dec 31, 2019, 11:45 PM IST
गणवेशातल्या पोलिसाची दारू पार्टी, नाशिकमधला व्हिडिओ व्हायरल title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलीस ड्रंक अँड ड्राइव्ह मोहीम अत्यंत काटेकोरपणे राबवत आहेत. दुसरीकडे नाशिकमध्ये एक पोलीस कर्मचारीच चक्क कर्तव्यावर असतानाच गणवेशात दारु पित असल्याचं आढळून आलं.

नाशिक ग्रामीण पोलिसांचा कैलास पोपट इंद्रीकर एका खासगी वाहनात, गणवेशातच दारु पित होता. एका अपघातग्रस्ताला वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी त्याच्याकडे धाव घेतली. तेव्हा तिथे खासगी वाहनात दारूच्या बाटल्या आणि खाण्याच्या पदार्थांसह पोलीस कर्मचारी कैलास इंद्रीकर दारु पीत असलेला त्यांना दिसला. संतप्त नागरिकांनी मोबाईलवर या साऱ्या घटनेचं चित्रीकरण करुन ते व्हायरल केलं. मात्र या गंभीर चुकीकरता इंद्रीकरची केवळ बदली करून त्याला दंड ठोठावण्यात आला आहे.

घडल्या प्रकाराने नाशिक ग्रामीण पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. ही केवळ एक घटना उघड झाली असून, अशा प्रकारे पोलिसांकडून बेदरकार आणि मनमानी कारभार सुरुच असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

एखाद्या गुन्ह्याची उकल झाली किंवा मुद्देमाल सापडला तर पोलीस उत्साहानं माध्यमांना सामोरे जातात मात्र अशा प्रकरणात पोलिसांनी आपलं मौन राखणे पसंत केले आहे . त्यामुळे सद निग्रहणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्यला काळीमा फासला जातो हे नक्की.