पेंच व्याघ्र प्रकल्पात गरुण-सापाच्या संघर्षाचा अफलातून फोटो

किस ऑफ डेथ!

Updated: Jun 13, 2018, 09:12 PM IST

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात गरुड आणि एका सापाच्या संघर्षाचे काही अफलातून फोटो नागपुरातील पक्षीमित्र नितिन मराठे यांनी टिपले आहे. नागपूरजवळच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील खूर्सापार गावाजवळ 9 जुनला त्यांनी हे फोटो टिपले आहे. सिल्लारी- खूर्सापार मार्गावर त्यांच्या गाडीसमोर अचानक एक गरुड खाली आला आणि त्याने जमिनीवरून जाणाऱ्या सापाला अलगद पकडून जवळच्या झाडावर नेले. त्यानंतर या क्रेस्टेड सर्पेंट ईगल ज्याला मराठीत तुर्रेवाला गरुड आणि स्ट्राईप्ड कील बॅक स्नेक अर्थात नानेटी या बिनविषारी सापातील संघर्ष सुरु झाला. गरुडाने चोचीने सापावर अनेक प्रहार केले. सापानेही गरुडाने तोंड उघडताच त्याच्या जिभेला दंश करून त्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. किस ऑफ डेथ अशा कॅप्शनने मराठे यांनी हा अफलातून फोटो टीपला. गरुडाच्या चोचीने घायाळ झालेला सापाचा संघर्ष 20 मिनटानंतर संपला आणि गरुडाने सापाला आपलं भक्ष्य बनवलं. गरुड आणि साप यांच्यातल्या या लढतीतील क्षण अन् क्षण मराठे यांनी कॅमेराबद्ध केला आहे.