धक्कादायक! क्षुल्लक कारणावरुन झाला वाद, धावत्या ट्रेनमधून तरुणाला खाली फेकलं

धावत्या ट्रेनमधून तरुणाला खाली फेकलं, तरुणाचा मृत्यू  

Updated: Aug 26, 2022, 07:41 PM IST
धक्कादायक! क्षुल्लक कारणावरुन झाला वाद, धावत्या ट्रेनमधून तरुणाला खाली फेकलं title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : धावत्या ट्रेनमध्ये दोन तरुणांमध्ये झालेल्या क्षुल्लक वादातून धक्काबुक्की झाली आणि एका तरुणाने दुसऱ्याला चक्क धावत्या ट्रेनमधून खाली फेकलं. यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नागपूर-पुणे गरीबरथमध्ये ही थरारक घटना घडली आहे. शेख अकबर असं मयत तरुणाचं नाव आहे. तो अकोला इथला रहिवासी आहे. गरीबरथ पुण्याहून नागपूरला येत असताना बुटीबोरी गुमगाव दरम्यान ही घटना घडली.

नागपुरात बाबा ताजुद्दीन यांचा ऊर्स असल्यामुळे यात सहभागी होण्याकरिता शेख अकबर हा त्याच्या काही मित्रांसह अकोल्याहून पुणे-नागपूर गरीबरथ या रेल्वे गाडीतून नागपूरला निघाला होता. रेल्वेगाडीत भरगच्च गर्दी असल्यामुळे शेख अकबर आणि त्याचे मित्र जनरल डब्यात दाराजवळ उभे होते. 

यावेळी या डब्यात अनेक प्रवासी हे दाटीवाटीने उभे आणि काही बसलेले होते. प्रवास सुरू झाला आणि गाडी ही सकाळी 8 च्या सुमारास बुटीबोरीजवळ पोहोचली. यावेळी शेख अकबर याचा पाय अन्य दुसर्‍या प्रवाशाला लागला. या किंचित कारणावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, रागाच्याभरात आरोपी तरुणाने काहीही विचार न करता शेख अकबरला चक्क धावत्या ट्रेनमधून खाली फेकलं.
 
यावेळी रेल्वे डब्यात मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. या सर्वांनी ही थरारक घटना बघितली. परंतु सर्वांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. कुणीही प्रवासी शेख अकबरच्या मदतीला धावून आला नाही. घटनेनंतर गाडी नागपूरच्या अजनी स्थानकावर पोहोचली तेव्हा अकबरच्या मित्रांनी घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. 

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस दलाने घटनास्थळी धाव घेतली. बुटीबोरी ते गुमगावदरम्यान रेल्वेलाईनच्या बाजूला शेख अकबरचा मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करण्यात आलं आहे.