Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: संपूर्ण देशाला प्रतिक्षा लागलेला अयोध्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा अखेर पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्यानगरी सजली असून, देशभरातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे. याशिवाय सोशल मीडियावरुनही देशवासीय आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही फेसबुकच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पार पडत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकला पोस्ट शेअर केली आहे. 'आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि 32 वर्षांनी शरयू नदी हसली', असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
याआधी राज ठाकरेंनी 22 जानेवारीला राज्यात चांगले कार्यक्रम आयोजित करा असं आवाहन केलं होतं. "22 जानेवारीला अयोध्या राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. राम मंदिराच्या बाकीच्या भानगडीत जाऊ नका. राम मंदिर होणं यापेक्षा ज्या कारसेवकांनी तिथे कष्ट घेतले त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे. त्यांच्यासाठी महाराष्ट्रात जे चांगलं करता येईल त्या सर्व गोष्टी करा. लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या," असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं.