पुणे : पुण्यात मंगळवारचं संकलन आणि साठणुकीतल्या दुधामुळे आजचा दिवस भागलाय. पण आज संकलन झालंच नाही, त्यामुळं उद्यापासून शहरांमध्ये दुधाचा तुटवडा निर्माण होणार आहे. पुणे विभागात दिवसाकाठी सुमारे ६५ लाख लीटर दूध संकलीत होतं. मंगळवारी दिवसभरात सुमारे ३५ लाख लीटर संकलन झालं. शिवाय विविध दूध संघांकडे मिळून सुमारे ३७ लाख लीटर दूध साठवलेलं होतं.
महत्त्वाचं म्हणजे संकलित झालेल्या दूधाचे टॅंकर्स शहरापर्यंत पोहोचूच शकले नाहीत. हे टॅंकर्स पुण्या - मुंबईकडे निघाले असताना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून ते परतवून लावले. थोडक्यात पुण्यात बुधवारपुरता साठा शिल्लक होता. गुरूवारपासून तुटवडा जाणवणार आहे.
चितळेंचं संकलन गेल्या तीन दिवसांपासून बंदच आहे... तर पुणे जिल्हा दूध संघ म्हणजे कात्रजचं संकलन निम्म्यावर आलंय. अशा परिस्थितीत उपलब्ध दूध काटकसरीनं वापरावं लागणार आहे.