Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरामध्ये पूर्व मध्य भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असतानाच अशीच काहीशी स्थिती गुजरातपासून केरळपर्यंत पाहायला मिळत आहे. सध्या या संपूर्ण हवामान प्रणालीचे थेट परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर दिसून येत असून, राज्याच्या काही भागांमध्ये पावसानं उसंत घेतली असली तरीही काही भागांमध्ये मात्र त्याची ये- जा सुरूच आहे.
पुढील 24 तासांसाठीच्या हवामान अंदाजाचा आढावा घ्यायचा झाल्यास राज्यातील पुणे आणि रायगड येथील घाटमाथ्यासह सातारा घाट क्षेत्रामध्ये हवामान विभागानं पावसाच्या तुरळक सरींचा इशारा दिला आहे. राज्याच्या कोकण किनारपट्टी क्षेत्रात पावराच्या हलक्या सरी वगळता अंतर्गत भागांमध्ये पाऊस काही अंशी उघडीप देताना दिसणार आहे असं म्हटलं जात आहे.
मुंबई शहर आणि उपनगरामध्येही परिस्थिती काहीशी अशीच असेल. जिथं कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31°C आणि 26°C असेल. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहून पर्जन्यमान मध्यम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये पावसाची अधूनमधून हजेरी असतानाच काही भागांमध्ये मात्र अनेक दिवसांनंतर सूर्यनारायणाचं दर्शन घडणार आहे. पुढील काही दिवस हे चित्र कायम राहणार असून, विकेंडच्या वारी पावसाळी सहलीसाठी बाहेर पडणार असाल तर काही क्षेत्रांमध्ये पाऊस दडी मारताना दिसला तरीही सृष्टीसौंदर्याला आलेला बहर मात्र भारावून सोडणार आहे.