Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या वेशीवरून पावसानं परतीचा प्रवास सुरु केला असला तरीही परतीच्या याच प्रवासादरम्यान पाऊस राज्याच मनसोक्त बरसताना दिसत आहे. रविवारपासून राज्यात पावसानं दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली असून, टप्प्याटप्प्यानं राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रापासून मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पावसानं जोरदार हजेरी लावली.
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात सध्या पाऊस सक्रिय झाला असून, पुढील 24 तासांसाठी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा या भागांना पावसाचा यलो लर्ट जारी करण्यात आला आहे. तर, गोवा आणि लागून असणाऱ्या कर्नाटक किनारपट्टी क्षेत्राला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईसह ठाणे आणि पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरही ढगांची दाटी असेल असा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान सोसाट्याचा वारा वाहणार असून वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असेल. सध्या मान्सूनचा प्रभाव असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला असला तरीही बंगालच्या उपसागराच्या मध्यावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळं त्याचं रुपांतर पुढील काही तासांमध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये होणार असून पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत आहेत.
Rainfall Warning : 24th September 2024
वर्षा की चेतावनी : 24th सितंबर 2024#rainfallwarning #IMDWeatherUpdate #stayalert #staysafe #konkan #goa #Karnataka #Gujarat #Maharashtra #marathwada #vidarbha #Kerala #Telangana #rayalaseema #andhrapradesh #Chhattisgarh #Odisha #Assam… pic.twitter.com/4UsZg3EA56
— India Meteorological Department (@Indiametdept) September 23, 2024
केंद्रीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये कर्नाटकच्या किनारपट्टी भागांना रेड अलर्ट, तर गुजरात, मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा, केरळ, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, ओडिशा, छत्तीसगढ आणि पूर्वोत्तर भारतात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.