Maharashtra Weather News : दडी मारून बसलेल्या पावसानं राज्यात पुनरागमन केलं आणि पाहता पाहता हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला. जुलैच्या सुरुवातीपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमधून पावसानं माघार घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, आता मात्र हा पाऊस पुन्हा एकदा राज्यात जोर धरताना दिसत आहे. पुढील 24 तासांचा अंदजा घ्यायचा झाल्यास राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचे अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
हवामान विभागाच्या माहितीनुसार सोमवारी 26 ऑगस्ट 2024 रोजी पालघर, रायगड, रत्नागिरीला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, या भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पुणे, सातारा, नंदूरबार जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याकील ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यातील पश्चिम घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून, त्याचे परिणाम सर्वदूर दिसून येणार आहेत. तर, अनेक जिल्ह्यांमधील जलप्रवाह दुप्पट ताकदीनं वाहणार आहेत. पुढील चार दिवसांसाठी पावसाचा जोर अधिक राहणार असून, काही जिल्हे मात्र यास अपवाद असतील.
तिथं, सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळं सातारा शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळं काही भागांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडम्याचा धोका असल्याची सावधगिरी बाळतच प्रशासनानं नागरिकांना सतर्क इशारा दिला आहे. (Satara Rain alert)
रविवारी झालेल्या अतिमुसळधार पावसानंतर नाशिकमध्ये गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळं गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली. पावसाचा जोर वाढल्यामुळे गंगापूर नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाल्यामुळं रामकुंडावरील अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहे. दरम्यान सध्या नाशिकच्या होळकर ब्रिज खालून 13000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. (Nashik Rain News)
नाशिक -ऑरेंज
नंदूरबार - ऑरेंज
मुंबई - यलो
पुणे - ऑरेंज
कोल्हापूर -ऑरेंज
सातारा -ऑरेंज
ठाणे - ऑरेंज
रायगड - ऑरेंज
रत्नागिरी - ऑरेंज
सिंधुदुर्ग - ऑरेंज
मध्य प्रदेशच्या वायव्य भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालं असून, हा पट्टा आता गुजरात आणि राजस्थानच्या दिशेनं पुढे सरकताना अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. तिथं नव्यानं तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि नजीकच्या भागांमध्येही पावसाचा जोर वाढला असून केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागांपर्यंत या कमी दाबाच्या पट्ट्याचे परिणाम दिसून येणार आहेत.