State Government Job Holiday List 2025 : नव्या वर्षाची सुरुवात होत नाही, तोच अनेकांना वेध लागले आहेत ते म्हणजे नव्या वर्षातील सणासुदीचे. बरं, इथं निमित्त सणाचं असलं तरीही खरं कारण आहे ते म्हणजे सुट्ट्यांच्या यादीचं. दरवर्षी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना राज्यातील महत्त्वाचे दिवस, कार्यक्रम आणि सणांच्या निमित्ताने प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात येते.
2025 या वर्षासाठीसुद्धा अशाच सुट्टया महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या राजपत्रातून जाहीर करण्यात आल्या आहे. या राजपत्रात नमूद करण्यात आल्यनुसार येत्या वर्षात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण 25 भरपगारी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या अख्तयारित येणाऱ्या सर्व विभागांसाठी काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सुट्टया लागू असतील.
राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या सुट्ट्या आणि वर्षभरातील सर्व 52 रविवारांना असणारी सुट्टी यामध्ये जोडल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाट्याला येणाऱ्या सुट्टयांचा आकडा 77 वर पोहोचत आहे. बँक आणि तत्सम आस्थापनांमध्ये महिन्याचा दुसरा आणि चौथ्या शनिवारीसुद्धा कर्मचाऱ्यांना सुट्टी लागू असते. या हिशोबानं साधारण 26 शनिवार पकडल्यास सर्व सुट्यांसाठी पात्र असणाऱ्या या कर्मचाऱ्यांना त्यातही विशेषत: बँक कर्मचाऱ्यांना 103 सुट्ट्यांचा लाभ घेता येणार आहे.
सरसकट सर्व शनिवार रविवारच्या सुट्टया धरून वर्षभरात सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचा आकडा 104 (शनिवार/रविवार) आणि 25 सरकारी सुट्ट्या यांची बेरीज केली असता तब्बबल 129 सुट्ट्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी पात्र आहेत.
26 जानेवारी 2025/ रविवार - प्रजासत्ताक दिन
19 फेब्रुवारी 2025/बुधवार - छत्रपती शिवाजी महाराज जयंती
26 फेब्रुवारी 2025/ बुधवार - महाशिवरात्री
14 मार्च 2025/ शुक्रवार- होळी
30 मार्च 2025/ रविवार- गुढीपाडवा
31 मार्च 2025/ सोमवार- रमझान ईद
6 एप्रिल 2025/रविवार- रामनवमी
10 एप्रिल 2025/गुरुवार- महावीर जन्मकल्याणक
14 एप्रिल 2025/सोमवार- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
18 एप्रिल 2025/ शुक्रवार- गुड फ्रायडे
1 मे 2025/ गुरुवार- महाराष्ट्र दिन
12 मे 2025/ सोमवार- बुद्ध पौर्णिमा
7 जून 2025/ शनिवार- बकरी ईद
6 जुलै 2025/ रविवार- मोहरम
15 ऑगस्ट 2025/ शुक्रवार- स्वातंत्र्य दिन
15 ऑगस्ट 2025/ शुक्रवार- पारसी नववर्ष
27 ऑगस्ट 2025/ बुधवार- गणेश चतुर्थी
5 सप्टेंबर 2025/ शुक्रवार- ईद ए मिलाद
2 ऑक्टोबर 2025/गुरुवार- महात्मा गांधी जयंती
2 ऑक्टोबर 2025/गुरुवार- दसरा
21 ऑक्टोबर 2025/ बुधवार- दिवाळी
5 नोव्हेंबर 2025/ बुधवार- गुरुनानक जयंती
25 डिसेंबर 2025/ गुरुवार- नाताळ
वरील सुट्ट्यांव्यतिरिक्त वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी राज्यातील बँकांना (शासकीय कर्मचारी वगळता) 1 एप्रिल 2025 रोजी सुट्टी लागू असेल. याशिवाय राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना यंदा 23 ऑक्टोबर 2025 रोजी भाऊबीजेच्या दिवशी विशेष सुट्टीसुद्धा लागू असेल.