महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा फोन टॅपिंगचा विषय; रश्मी शुक्लांवरून वार-प्रहार

Rashmi Shukla : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांवर मविआच्या नेत्यांनी पुन्हा एकदा फोन टॅपिंगचे आरोप केलेत.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापाठोपाठ खासदार संजय राऊत यांनीही रश्मी खुक्लांवर आरोप केलेत.

वनिता कांबळे | Updated: Nov 1, 2024, 11:21 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा फोन टॅपिंगचा विषय; रश्मी शुक्लांवरून वार-प्रहार title=

Maharashtra Assembly Elections 2024 : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर मविआच्या नेत्यांनी पुन्हा एकदा फोन टॅपिंगचे आरोप केलेत.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठोपाठ खासदार संजय राऊत यांनीही शुक्लांवर आरोप केलेत.. रश्मी शुक्ला आजही मविआच्या नेत्यांचे फोन टॅप करतात, असा आरोप राऊतांनी केलाय. पदाधिका-यांना तडीपार करून राज्यातील निवडणुका ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरूये आणि याचा सूत्रधार रश्मी शुक्ला आहेत... निवडणूक आयोग त्यांना पदावरून का हटवत नाही? असा सवाल राऊतांनी विचारलाय. 

तर कर नाही त्याला डर कशाला असं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणेंनी मविआच्या नेत्यांवर जोरदार पलटवार केलाय.. तर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही संजय राऊतांवर निशाणा साधलाय..

मविआचं सरकार असताना मविआच्या अनेक नेत्यांचे फोन रश्मी शुक्लांनी टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तेव्हाही या विषयावरून मोठं राजकारण तापलं होतं.. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही रश्मी शुक्लांवर आरोप करण्यात आल्यानं पुन्हा एकदा वातावरण तापल्याचा पाहायला  मिळतंय..

विधानसभा निवडणुकीत काही विध्वंसक करण्याचा विरोधकांचा डाव आहे. म्हणून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी होतेय. असा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केलाय. संजय राऊतांच्या आरोपांवर ते बोलत होते.

संजय राउतांकडे रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुरावे असल्यास त्यांनी ते निवडणूक आयोगाकडे द्यावेत. असं प्रत्युत्तर शंभुराज देसाईंनी संजय राऊतांच्या आरोपांवर दिलंय. पारदर्शक निवडणूक करायची असल्यास रश्मी शुक्लांना पदावरून हटवा. अशी मागणी राऊतांनी केली होती.