Satej Patil On Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीमधून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अखेरच्या दिवशी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर जिल्हातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अगदी शेवटच्या क्षणी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल्या मधुरीमाराजे (Madhurima Raje) यांनी माघार घेतली. अर्ध्या तासाहून कमी वेळ शिल्लक असताना काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना मधुरीमाराजे माघार घेणार असल्याचं कळवण्यात आल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजही उपस्थित होते. या दोघांच्या समोरच मधुरीमाराजेंनी उमेदवारी मागे घेत असल्याच्या अर्जावर स्वाक्षरी घेतली. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात असून यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही खोचक शब्दांमध्ये काँग्रेसवर निशाणा साधला. मात्र फडणवीसांनी केलेल्या या टीकेला आज सतेज पाटलांनी जशास तसं उत्तर दिलं.
काँग्रेसकडून कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून मधुरीमाराजे यांना एबी फॉर्म देत उमेदवारी देण्यात आली. पक्षाच्या एबी फॉर्मसहीत त्यांनी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज देखील दाखल केला होता. पक्षातील वरिष्ठांनी आधी उमेदवारी जाहीर केलेल्या राजेश लाटकर (Rajesh Latkar) यांची उमेदवारी रद्द करून मधुरीमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शेवटच्या क्षणी मधुरीमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खासदार शाहू छत्रपती यांच्या समोर सतेज पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मधुरीमाराजे यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटील चांगलेच संतापलेल्याचं दिसून आलं. संतापून त्यांनी शाहू महाराजांसमोरच निर्णय पटला नसल्याचं सांगितलं. "दम नव्हता तर उमेदवारी कशाला घेतली?" अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. "जर लढायचे नव्हते तर उमेदवारी घ्यायलाच नको होती. मी माझी ताकद दाखवली असती," अशा शब्दांत त्यांनी नाराजी बोलून दाखवली. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्याने काँग्रेस तोंडघाशी पडली.
अर्ज मागे घेण्याच्या फॉर्मवर स्वाक्षरी करुन मधुरीमाराजे बाहेर पडल्यानंतर दरवाजातच सतेज पाटील यांनी शाहू छत्रपती यांच्या समोरच, "हे पूर्णपणे माझी फसवणूक केल्यासारखं आहे. हे नाही चालणार. मग आधीच नाही म्हणून निर्णय घ्यायला हवा होता. मला काही अडचण नव्हती. हे चुकीचं आहे महाराज. हे मला काही मान्य नाही. मला तोंडघशी पाडण्याची गरज नव्हती," असं म्हणत नाराजी व्यक्त केली. तसेच शाहूंच्या समर्थकांना सतेज पाटलांनी, "हे अजिबात बरोबर नाही, तुम्ही जेवढ्यांनी आग लावली त्या सर्वांना सांगत आहे," असं म्हणत आपला संताप व्यक्त केला.
"सगळा प्रकार आश्चर्यकारकच आहे. ज्या काही घडामोडी झाल्यात त्यावरुन एक गोष्ट लक्षात आली की, या ठिकाणी उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस मात्र गायब झालेली आहे हे निश्चितपणे पाहायला मिळत आहे," अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नोंदवली होती. याच विधानाचा संदर्भ देत पत्रकारांनी सतेज पाटलांना, "फडणवीस यांनी कोल्हापूर उत्तरमधून पंजा गायब झाला ही सुरुवात आहे असं म्हटलं आहे," असं विचारला. त्यावर सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया नोंदवताना, "मला वाटतं आता महाराष्ट्रातील जनता महायुतीला गायब करेल. 20 तारखेला मतदान झाल्यावर, हे त्यांना लक्षात येईल," असं म्हटलं.
नक्की पाहा >> ...अन् सतेज पाटील कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडले! कोल्हापूरमधील राड्यानंतरचा Video पाहाच
सतेज पाटील यांनी पुढे बोलताना मागील काही महिन्यांमध्ये घडलेल्या प्रमुख घटनांचा पाढाच वाचून दाखवला. "महाराष्ट्रातील जनता मालवणमध्ये झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान विसरणार नाही. बदलापूरमध्ये एका लहान मुलीवर अत्याचारात कुणी पाठीशी घातलं विसरणार नाही. पुण्यात एका तरुणाला उडवलं गेलं हे विसारणार नाही. शेतकऱ्यांचा सन्मान राखलेला नाही हे विसरणार नाही. त्यांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा ते 20 तारखेनंतर गायब होतील," असा खोचक टोला सतेज पाटलांनी लगावला.