Eknath Shinde On Chief Minister Post: महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचं उत्तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवस उलटल्यानंतरही राज्याच्या जनतेला मिळालेलं नाही. मुख्यमंत्रिपदावरुन सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ वाढवून मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याची चर्चा आहे. स्वत: शिंदेंनी आपण नाराज नसल्याचं सांगत भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं सांगितलं. मात्र त्यानंतरही सत्तेतील वाट्यावरुन नाट्य सुरुच आहे. अशातच अचानक साताऱ्यामधील आपल्या दरे या मूळगावी गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना आपणच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत, असं विधान केलं आहे. होय मी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे. कॉमन मॅन म्हणून जनतेची कामं केली! पण कोणताही संभ्रम नको म्हणून मी पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट करताना भाजपाचं केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं आधीच स्पष्ट केल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे.
तुम्ही मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी आहे. अनेकांकडून अशी मागणी होत आहे. याबद्दल काय ठरलं? असा प्रश्न शिंदेंनी ठाण्याला निघण्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शिंदेंनी, "सहाजिक आहे, मी जनतेचा मुख्यमंत्री म्हणून काम केलं," असं म्हटलं आहे. पुढे बोलताना, "मी म्हणायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्ट नाही तर कॉमन मॅन! कॉमन मॅन बनून मी कॉमन मॅनच्या अडचणी, दु:ख समजून घेऊन सोडवण्याचा करण्याचा प्रयत्न केला. सहाजिक आहे लोकांची भावना," असंही शिंदे म्हणाले.
निवडणुकीतील कामगिरीबद्दल भाष्य करताना एकनाथ शिंदेंनी, "मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या. दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्यासोबत होते. माझे सहकारी सोबत होते. मिळालेलं यश हे प्रचंड आहे. कोणताही संभ्रम नको म्हणून मी मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित भाई शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्रिपदाबद्दल जो काही निर्णय घेतील त्याला माझा आणि शिवसेनाचा पूर्णपणे पाठिंबा आहे. शेवटी मी मनमोकळेपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे. मी माझा निर्णय घेतला आहे," असं विधान केलं.
तुम्हाला गृहखातं पाहिजे का? असा थेट प्रश्न अन्य एका पत्रकाराने शिंदेंना विचारला. त्यावर उत्तर देताना शिंदेंनी, "चर्चा होईल आणि त्यातून बऱ्याच गोष्टी निघतील. ज्यांनी आम्हाला निवडून दिलं आहे त्या लोकांना आम्ही कमिटमेंट केली आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने लोकांबरोबरची आमची बांधिलकी जपायची आहे. महाराष्ट्रातील लोकांना काय मिळणार हे महत्त्वाचं आहे. मला काय मिळणार, तुला काय मिळणार यापेक्षा लोकांसाठी काय काम करायचं आहे ते महत्त्वाचं आहे," असं म्हटलं.