Maharashtra Election: ठाकरे, मुंडेंसहीत अनेक बडे नेते आजच भरणार अर्ज; कारण...

Maharashtra Assembly Election 2024 Why Many Big Leaders Are Filing Nomination Today Know The Reason: अगदी शरद पवार, राज ठाकरेही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र आजच अनेकजण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत जाणून घ्या.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 24, 2024, 07:27 AM IST
Maharashtra Election: ठाकरे, मुंडेंसहीत अनेक बडे नेते आजच भरणार अर्ज; कारण... title=
आज अनेक मान्यवर भरणार उमेदवारी अर्ज

Maharashtra Assembly Election 2024 Why Many Big Leaders Are Filing Nomination Today Know The Reason: राज्याच्या विधानसभेचं बिगुल वाजून दीड आठवड्यांहून अधिक कालावधी उलटला असला तरी अनेक प्रमुख नेत्यांनी अजून उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे. मात्र आज म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी अनेक महत्त्वाचे नेते उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मोठं शक्तीप्रदर्शनही करणार आहे. खरं तर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्यानुसार 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पहिल्या दोन दिवसांमध्ये अनेकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फॉर्म घेतले असले तरी प्रत्यक्षात अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. मात्र आज अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनेक नेते हजेरी लावतील असं सांगितलं जात आहे.मुंबईत वरळीमधून आदित्य ठाकरेही विधानसभा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र अनेक प्रमुख नेत्यांकडून आजच अर्ज दाखल करण्यामागे एक विशेष कारण आहे. 

स्वत: राज ठाकरे आणि शरद पवारांची उमेदवारी अर्ज भरताना हजेरी

ठाण्यामध्ये आज अर्ज भरण्यासाठी बड्या नेत्यांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जितेंद्र आव्हाड, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर मतदारसंघाचे उमेदवार अविनाश जाधव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वत: शरद पवार उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे अविनाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज ठाकरे ठाण्यात दाखल होणार आहेत. पुण्यातून चंद्रकांत पाटील अर्ज दाखल करणार आहेत. तर शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील अर्ज दाखल करणार आहेत. तसेच बीडमधून आज धनंजय मुंडेही अर्ज भरणार आहेत.

आजच अर्ज भरण्याची घाई का? 

राज्यातील अनेक बडे नेते आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वत: हजर राहणार आहेत. अजित पवार वगळता राज्यातील सर्वच बडे नेते आज स्वत: अर्ज भरण्यासाठी किंवा आपल्या पक्षातील बड्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी गर्दी करण्यामागील कारण म्हणजे आजचा दिवस फारच खास आहे. आज गुरुपुष्यामृत योग जुळून आला आहे. हाच योग साधत अनेक नेते आजच अर्ज भरणार आहेत. आज चंद्र संपूर्ण दिवस-रात्र पुष्य नक्षत्रात राहणार असल्याने दुर्मीळ 'गुरुपुष्यामृत योग' जुळून आला आहे. सूर्योदयापासून म्हणजेच सकाळी 6.37 वाजल्यापासून उद्या म्हणजेच शुक्रवारी सकाळी 6.37 वाजेपर्यंत हा योग असेल. या काळात सोने आणि मौल्यवान वस्तू खरेदीची पारंपार मागील अनेक वर्षांपासून आहे. तसेच या दिवशी चांगल्या कामाचा प्रारंभ या दिवशी करण्याची प्रथा आहे. त्यामुळेच आज अनेकजण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आजच्या गुरुपुष्यामृत मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केल्यास लाभ होईल असा अंदाज असल्याने अनेकजण आजच उमेदवारी अर्ज दाखल करतील असं सांगितलं जात आहे.