Amaravati Politics: बडनेरा मतदारसंघ हा अमरावतीतील सर्वात चर्चेतील मतदारंसघ आहे. मात्र याच बडनेरा मतदारसंघात बंडखोरांनी बंडाचा झेंडा कायम ठेवलाय.. या बंडखोरांमुळे विद्यमान आमदार रवी राणा यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघात बंडखोरांचं पीक आलंय. मविआ आणि महायुतीत बंडखोरांचा बंडाचा झेंडा कायम आहे. त्यामुळं विद्यमान आमदार रवी राणांचं सँन्डविच झाल्याचं पाहायला मिळतंय.. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून रवी राणा रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय अपक्ष रिंगणात उतरलेत..
बडनेरा मतदारसंघातून हॅट्रीक मारलेले रवी राणा यांना यावेळी महायुतीचा पाठींबा आहे. मात्र, रवी राणांनी महायुतीची फसवणूक केली असून वरिष्ठ नेते त्यांचा पाठिंबा काढणार असल्याचा दावा तुषार भारतीय यांनी केलाय.दुसरीकडे माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांनी मविआतून उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी केलीये.. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय.. मी बंडखोर उमेदवार नसून पर्यायी उमेदवार असल्याचा दावा प्रीती बंड यांनी केलाय. बडनेरा विधानसभा मतदारसंघात आता 20 पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुती आणि मविआतले बंडखोर असल्यानं या मतदारसंघात थेट कुणाचा कुणाशी सामना होईल हे सांगता येत नाही.
महाविकास आघाडीतली बंडखोरी शमून जाईल असा दावा काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला होता. पण वस्तूस्थिती मात्र वेगळीच दिसू लागलीय. महाविकास आघाडीत बंडोबांचा झेंडा कायम असल्याचं उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झालंय.काटोल मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सलील देशमुखांना काँग्रेसच्या याज्ञवल्क्य जिचकार यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिलंय.पुण्यात कसबा मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना बंडखोर कमल व्यवहारेंनी आव्हान दिलंय.पुण्यातल्याच पर्वतीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अश्विनी कदम या उमेदवार असताना काँग्रेसच्या आबा बागुल यांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधात दंड थोपटलेत.शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेसचे दत्ता बहिरट यांना बंडखोर मनिष आनंद यांनी आव्हान दिलंय. सावनेर विघानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अनुजा केदार यांच्याविरोधात काँग्रेसचेच अमोल देशमुख यांनी आव्हान दिलंय.उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील बंडखोरांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिलीय.नाना पटोले तर बंडखोरांच्या संपर्कात असल्याचं म्हणत होते. पण कोल्हापूरसारख्या ठिकाणी त्यांना काँग्रेसच्या बंडखोरांनी गुलीगत धोका दिलाय. एवढंच नव्हे तर विदर्भातही ठिकठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी केलीय.बंडखोरांवर फक्त हकालपट्टीची कारवाई करुन चालणार नाही तर त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. अन्यथा महाविकास आघाडीत बंडखोर मोठी पाडापाडी करतील अशी भीती व्यक्त केली जातेय.