सचिन कसबे / पंढरपूर : सोलापूर जिल्हा हा तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. अनेक वर्ष इथे काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अशी सत्ता राहिलेली आहे. पूर्वीच्या पंढरपूर आणि आताचा माढा लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा देशात चर्चेत आला आहे. कारण दहा वर्षांनी पुन्हा एकदा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संभाव्य उमेदवार असतील अशी चर्चा आहे. कदाचित ते पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणूनही पुढे येतील म्हणून माढा चर्चेत आला आहे. काय आहे इथली राजकीय परिस्थिती?
2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत पूर्वीचा पंढरपूर लोकसभा मतदारसंघ हा नव्याने माढा लोकसभा मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला. पंढरपूर लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि खानापूर तालुक्याचा समावेश होता. माढा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण विधानसभा मतदारसंघ जोडले गेले.
पंढरपूर लोकसभा मतदारसंघ असताना १९७७ पासून १९९९ पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. संदिपान थोरात यांनी सलग पाच वेळा या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून विजय मिळवला होता. थोरात यांना सहजपणे विजयी करण्यात विजयसिंह मोहिते पाटील यांची मोठी ताकत होती. कारण सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागावर मोहिते-पाटील घराण्याचे असलेल वर्चस्व, त्यांचे राजकीय वजन असल्यानेच काँग्रेस पक्ष सहज विजयी होत गेला. १९९९ ला शरद पवार काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर मोहिते - पाटील सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि पहिली लोकसभा निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्यावर आणि मोहिते-पाटील यांच्या मदतीवर रामदास आठवले १९९९, २००४ अस दोन वेळा चांगल्या मताधिक्याने विजयी झाले. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसचे या मतदारसंघातील ताकत वाढली होती.
२००९ ला मतदारसंघ पुनर्रचनेत पंढरपूर लोकसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघ म्हणून नव्याने अस्तित्वात आला. सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि खानापूर वगळून नव्या मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण हे दोन मतदारसंघ समाविष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ म्हणून ओळख आहे. २००९ ला विजयसिंह मोहिते-पाटील माढामधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र राजकीय सत्ता संघर्षातून त्याना माघार घेत शरद पवार यांनाच निवडणूक लढवण्याची मागणी करावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याने साहजिकच शरद पवार तीन लाख मताधिक्याने माढामधून निवडून आले. केंद्रात कृषीमंत्री झाले.
२०१४ मोदी लाटेचा अंदाज घेत शरद पवाराxनी लोकसभा निवडणुक न लढवता राज्यसभेवर जाणे पसंत केले. माढामधून पुन्हा पवारांचा वारसदार कोण हा प्रश्न आला. यावेळी मात्र मोहिते-पाटील यांच्या ताकतीचा अंदाज घेत विजयसिंह मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी ऊस दर आंदोलनातून या मतदारसंघात आपले जनमत तयार केले होते. भाजपने ही जागा सदाभाऊ खोत यांना दिली. मोदी लाट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी असताना मोहिते-पाटील यांनी आजवरच्या राजकीय अनभुव आणि संपर्क असल्याने पंचवीस हजार मतांनी विजय मिळवला. पुन्हा एकदा माढा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असल्याचे सिध्द केले.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील मोहिते-पाटील विरोधक म्हणून ओळखले जाणारे संजय शिंदे यानी राष्ट्रवादी काँग्रेसच बहुमत असतानाही भाजपच्या मदतीने जिल्हा परिषद अध्यक्ष पद मिळवले. तर प्रशांत परिचारक यांनी सुध्दा भाजपच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असताना विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवला. हे जरी भाजपसोबत असले तरी यांची राजकीय सुरूवात पवार यांच्या पासूनच झाली आहे.
पाच वर्षात मोहिते-पाटील यांनी जनतेशी चांगला संपर्क ठेवला. विरोधी पक्षातील खासदार असतानाही मतदारसंघात निधी आणून काम केली. त्यामुळे माढामधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा विजयसिंह मोहिते-पाटीलच निवडणूक लढतील असे वातावरण असताना सर्वांच्या शक्यता फोल ठरवत पुन्हा माढामधून शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
माढाचे आमदार शिंदे, करमाळ्यातील माजी आमदार बागल गट आणि सांगोल्यातील दीपक साळुंखे अशा राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजी आणि विरोधातून मोहिते-पाटील यांच्या बद्दल पक्षश्रेष्ठीपर्यंत नाराजी पोहोचवण्यात आली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हक्काचा असणारा माढा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत राजकीय नाराजीतून हातून जाऊ नये. यासाठी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माढामधून निवडणूक लढवण्याची गळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घातली. शरद पवार यानी अद्याप लढायचे की नाही याबाबत निर्णय दिला नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्यांनी मात्र पवारच लढणार अशी तयारी सुरू केली आहे.
देशातील राजकीय घडामोडी २०१९ च्या लोकसभा निवडणूक निकालानंतर बदलू शकतात. देशातील प्रत्येक राज्यात ताकत असलेल्या छोट्या पक्षांच्या एकत्र येण्याने पवार पंतप्रधान होतील, अशी आशा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे पवार माढामधून निवडणूक लढवतील या चर्चेने हा मतदारसंघ देशभरात चर्चेत आला आहे.