Ladki Bahin Yojana : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरल्याचं बोललं जातंय.. आता अर्थसंकल्पिय अधिवेशनात पंधराशे रुपयांचे एकविसशे रुपये करण्याचा वायदा ही सत्ताधाऱ्यांनी केलाय.. मात्र त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी लाडकी बहिण योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. लाडकी बहीण योजनेच्या निकषांत बदल करा अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीसांनी करणार असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय. दोन अपत्य असलेल्या बहिणींचाच योजनेत समावेश करण्याची मागणी नितेश राणेंनी केलीय. या निकषातून आदिवासी बांधवांना सूट द्या असंही नितेश राणे म्हणालेत.
नितेश राणेंच्या या मागणीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय..तर नितेश राणेंनी ही विधान केवळ मुस्लिमांबाबत केलेलं नाही असं म्हणत शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी नितेश राणेंची पाठराखण केलीय.
लाडकी बहिण योजनेच्या नियमांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही असा दावा सरकारकडून अनेकदा करण्यात आलाय.. त्यामुळे नितेश राणेंनी केलेल्या या मागणीचा सरकार विचार करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाज माध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती. सोशल मिडियावर पोस्ट करत अदिती तटकरे यांनी आवाहन केले आहे.