IAS Pooja Khedkar Controversy: आयएएस पूजा खेडकर प्रकरणाने यूपीएससीसोबतच महाराष्ट्रातील शासकीय यंत्रणादेखील हादरली आहे. आयएएस बनताना आपण दिव्यांग असल्याचे कागदपत्र त्यांनी दिले पण प्रत्यक्षात चाचणीला जाण्यास त्यांनी टाळाटाळ केल्याचे उघड झाले आहे. खासगी ऑडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासनची पाटी लावण्यावरुन सुरु झालेला हा प्रवास खासगी कार्यालय, वरिष्ठावर मानसिक शोषणाचे आरोप असा सुरु राहिला. यानंतर त्यांची आई मनोरमा खेडकर यांचे 2 वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाले. ज्यात त्या अरेरावी करताना दिसल्या. पूजा खेडकरांचे वडीलदेखील संपत्तीमुळे वादात सापडले. संपूर्ण खेडकर कुटुंबाचा पाय दिवसेंदिवस खोलात जात असताना आता राज्यभरातील 'दिव्यांग' म्हणून सरकारी नोकरी मिळवलेले कर्मचारीदेखील वादाच्या भोवऱ्यात आले आहेत.
नाशिक जिल्हा परिषदेतही दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सरकारी भरती होत असताना दिव्यांगांना सवलत दिली जाते. परीक्षा अर्ज भरताना संबंधित उमेदवार दिव्यांगाचा पर्याय निवडतात. दिव्यांग उमेदवार हे सवलतीस पात्र असतात. पण काही उमेदवार दिव्यांग नसतानाही त्या कॅटेगरीतून अर्ज करतात आणि सर्व सवलती मिळवतात. पूजा खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात येतोय. यानंतर राज्यभरातील शासकीय यंत्रणेत 'दिव्यांग' उमेदवाराची पडताळणी करण्यात आली आहे.
दिव्यांगांना शासनाकडून विशेष यूआयडी क्रमांक दिला जातो.दिव्यांगांची माहिती, अपंगत्वाचे प्रमाण हे सर्व तपासून हा क्रमांक दिला जातो. यूआयडी क्रमांक देऊन खूप वर्षे झाली असतील तर तो अपडेट करण्याचे आवाहन केले जात आहे. नाशिक जिल्हा परिषदेत अनेक कर्मचा-यांनी बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचा संशय निर्माण झालाय.गेल्या वर्षभरापासून कर्मचा-यांची युआयडी क्रमांक देण्यास टाळाटाळ केल्याने 69 कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
साडे पंधरा हजार कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये अद्याप 69 जणांनी युआयडी क्रमांक सादर केलेले नाहीत. पूजा खेडकर प्रमाणे अनेक जणांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवण्याचा संशय आहे...सर्वच दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन नोकरी करणाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीची फेर पडताळणीची मागणी करण्यात आलीय.