मुंबई : मुंबई, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पावसाने कहर केला आहे. राज्यात पुढचे 3 दिवस सर्वत्र वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस असेल असा अंदाज अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरातील कमी दाब्याच्या क्षेत्रांमुळे देशात पावसाचा कालावधी लांबला आहे.
यंदा सप्टेंबर महिना संपत आला असला तरी राज्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे परतीचा पाऊस लांबणीवर पडला आहे.
मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर आणि नांदेडमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावासाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या तिन्ही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसंच मुसळधार पावसासह वाऱ्यांचा वेग अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान देखील सर्वत्र पावसाच्या सरी बरसणार आहेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.